पुण्यात रिंग रोड कामादरम्यान ऑपरेटरचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:36 IST2026-04-04T12:34:54+5:302026-04-04T12:36:02+5:30
- विजय कुमार हा रिंग रोड प्रकल्पावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. काम सुरू असताना तो क्रेनवर चढत असताना घसरला.

पुण्यात रिंग रोड कामादरम्यान ऑपरेटरचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
हवेली (पुणे जि.) - पुण्यातील वरदाडे परिसरात रिंग रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विजय कुमार या तरुण ऑपरेटरचा नदीपात्रात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अधिकच्या माहितीनुसार, विजय कुमार हा रिंग रोड प्रकल्पावर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. काम सुरू असताना तो क्रेनवर चढत असताना घसरला. शिडीवरून पाय घसरल्याने तो सुमारे ४० फूट खोल पाण्यात कोसळला. घटनावेळी लाइफ जॅकेट, सेफ्टी बेल्ट यांसारखी साधने वापरली नव्हती विजय कुमारला पोहता येत नव्हते, काही क्षणांतच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून काही वेळात मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "सुरक्षा नियमांचे पालन झाले असते, तर जीव वाचला असता" अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष, कामगारांना आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव, सुरक्षात्मक उपकरणांची कमतरता या बाबी प्राथमिक तपासात समोर आल्या आहेत. पोलीस प्रशासनाने प्रकरणाची नोंद घेतली असून नेमकी जबाबदारी कोणाची? सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का? याचा तपास सुरू आहे. रिंग रोडसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये अशा घटना घडल्याने कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते का? नियम फक्त कागदावरच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.