बोगस मतदार पकडला, तरच भाजपला गाडू; उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 12:18 IST2025-10-05T12:16:01+5:302025-10-05T12:18:36+5:30
अनेकांनी शिवसेना फोडण्याचा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शिवसेना संपतच नाही. अजूनही दिल्लीतून शिवसेना संपवण्यासाठी मोघलांप्रमाणे प्रयत्न केले जातात.

बोगस मतदार पकडला, तरच भाजपला गाडू; उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
पुणे : प्रत्येक बूथ प्रमुखाने घराघरात शिवसेनेचे काम पोहोचवा, बूथप्रमुख आणि गट प्रमुखांची मजबूत बांधणी केली, तर पुढची किमान पंचवीस वर्षे आपल्या सत्तेला कोणी धक्का लावू शकणार नाही. मात्र, बोगस मतदार पकडा, तरच आपण निवडणुकीमध्ये भाजपला गाडू शकणार आहोत. त्यामुळे कोणी बोगस मतदार आढळला, तशी खात्री झालीच, तर त्याच्या कानाखाली लगावा, अशा सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
पुण्यातील लोकशाही अण्णा भाऊ साठे सभागृहात शनिवारी (दि.४) ठाकरे यांनी पुणे शहर शिवसेना शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, आ. मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, पुणे महापालिका निवडणुकीवेळी माझ्या सभेला न्यू इंग्लिश स्कूल मैदान गर्दीने ओसंडून वाहत होते. मात्र, त्याच ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांमुळे मुख्यमंत्री सभा न घेताच परतले होते. निकाल लागल्यानंतर रिकाम्या खुर्च्या आपल्या नशिबी आणि भरलेल्या त्यांच्या नशिबी आल्या. सभा न घेता त्यांचे १०० नगरसेवक निवडून आले. संघटनेची बांधणी जोपर्यंत भक्कम होत नाही, तोपर्यंत रिकाम्या खुर्च्या असून, विरोधक जिंकले कसे? आणि भरलेले मैदान असून आपण हारलो कसे? याचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे नळापासून ते घरगुती छळापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेच्या शाखेत मिळायला हवेत. शिवसेनेच्या शाखा म्हणजे जनता दरबार हवा. त्यामुळे आता मी नुसता शाखाप्रमुखावर समाधानी नाही. मला प्रत्येक शाखेत गटप्रमुख हवा आहे.
उत्साहाच्या भरात हुरळून जाऊ नका; घात करून घ्याल. जिंकायचे असेल, तर हरलेल्या मानसिकतेने आपण जिंकण्याची स्वप्न बघू शकत नाही. जिंकण्याची ईर्षा पाहिजे, तरच आपण विजयाच्या जवळ जाऊ शकतो. रोज शाखा उघड्या राहिल्या पाहिजेत. शाखेत हजेरी लावणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. गेल्या साठ वर्षांत कमी काळ सत्ता हाताशी असूनही शिवसेनेची ताकद कमी होत नाही. अनेकांनी शिवसेना फोडण्याचा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शिवसेना संपतच नाही. अजूनही दिल्लीतून शिवसेना संपवण्यासाठी मोघलांप्रमाणे प्रयत्न केले जातात.
मतचोरीचा पर्दाफाश करू
भाजपने यंत्रणेला पाडलेली भोकं बुजवली पाहिजते. मतदार यादीत घुसवलेले बोगस मतदार शोधून बाद केल्यानंतर आपण निवडणुका नक्की जिंकू. देशात झालेल्या मतचोरीची पोलखोल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे केली, त्याप्रमाणे आपणही मुंबईमध्ये झालेल्या मतचोरीचा पर्दाफाश करणार आहोत. यामुळे मतचोरीसह बोगस मतदारांची आपण नाकाबंदी करू, असेही ठाकरे म्हणाले.