जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 19:48 IST2025-09-28T19:47:59+5:302025-09-28T19:48:07+5:30
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे

जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पावसामुळे खरीप कांदा लागवड उद्ध्वस्त
आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. रब्बी हंगामातील नुकसानीतून सावरायच्या आतच खरीप हंगामातील नवीन कांदा लागवड अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति एकर हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा कांद्याच्या कोवळ्या रोपांवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीत पाणी साचल्याने कांदा लागवड पूर्णपणे खराब झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरी आणि सिंचन यासाठी केलेला मोठा खर्च आता वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, कर्जाची परतफेड करणे जवळपास अशक्य झाले आहे. शेतकरी आता प्रशासनाकडे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करत आहेत. “रब्बी हंगामात कांदा सडला, आता खरीप कांदा पाण्यात गेला. कांदा न चिरतादेखील डोळ्यात पाणी आणतोय!” अशी खंत शेतकरी विजय चव्हाण यांनी व्यक्त केली.
तहसील कार्यालय आणि कृषी विभागाकडून अद्याप पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत असून, शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कांदा लागवडीसाठी केलेला खर्च आणि आता झालेले नुकसान यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पाहता शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, भविष्यात अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक मदत योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे.