पुणे-शिरूर उड्डाण पुलासाठी दीडपटीने अधिक निविदा दाखल;मान्यता मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:01 IST2025-10-07T20:00:50+5:302025-10-07T20:01:29+5:30
राज्य सरकारने पुणे ते शिरूर दरम्यान ५४ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे-शिरूर उड्डाण पुलासाठी दीडपटीने अधिक निविदा दाखल;मान्यता मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे ते शिरूर दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने (एमएसआयडीसी) काढलेल्या निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा (इस्टिमेट) सुमारे ४६ टक्के जादा दराने आल्या आहेत. यापूर्वीच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने महामंडळाने आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन काॅरिडाॅरसाठीच्या कामाचाही यात समावेश केला. हे साडेचार हजार कोटी रुपयांचे असून यासाठी तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. त्या अधिक दराच्या असल्याने त्याला मान्यता मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य सरकारने पुणे ते शिरूर दरम्यान ५४ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्याऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सुविधा महामंडळाकडून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुविधा महामंडळाने या उड्डाणपुलाच्या कामाबरोबरच पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीन काॅरिडाॅरसाठी भूसंपादन करण्याच्या कामाचा समावेश करून साडेचार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित (इस्टिमेट) धरून या निविदा काढण्यात आल्या. त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद देत निविदा दाखल केल्या होत्या. त्या निविदा महामंडळाकडून उघडण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने ८ हजार ७४५, तर अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने १० हजार १२४ आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी १० हजार ३३५ रुपयांची निविदा भरली आहे. सुविधा महामंडळाने केलेल्या इस्टिमेट रकमेपेक्षा ४५.९५ टक्के जादा दराने निविदा आल्या आहेत. त्यावर सुविधा महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या रस्त्याचा येरवडा ते खराडी हा पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग आहे. मध्यंतरी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बैठक घेतली होती. येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहापदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करायचे, यासंबंधीचा आराखडा करावा. त्यासाठी सुमारे ३ हजार कोटी खर्च अपेक्षित असून त्यासाठी केंद्राकडूनही निधीची मदत घेता येईल, असे सांगितले होते.