झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:53 IST2025-09-30T13:52:24+5:302025-09-30T13:53:23+5:30
सीईओ गजानन पाटील यांच्या सुनावणीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार

झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात
जेजुरी (पुणे जि. ) :पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे जाहीर झालेल्या बदल्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. १८ सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा परिषदेने या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले होते; परंतु सुमारे २५० शिक्षकांनी ‘बदली नको’ म्हणत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याने कार्यमुक्ती प्रक्रिया रखडली आहे. यामुळे साडेचार हजार शिक्षक अजूनही अनिश्चिततेत आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बदली नको असलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, आज पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक आणि शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ज्येष्ठ शिक्षकांच्या बदल्या टाळण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा प्रशासनाकडे धावपळ करत आहेत. सीईओ गजानन पाटील यांच्या सुनावणीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, इतर काही जिल्हा परिषदांनी दिवाळीनंतर कार्यमुक्तीचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्हा परिषदही तसाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बदली पात्र साडेचार हजार शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत होणाऱ्या बदल्या यंदा प्रथम सत्रानंतर आणि दिवाळीच्या सुट्टीत होत असल्याने शिक्षकांचा उत्साह कमी झाला आहे. परिणामी, साडेचार हजार शिक्षकांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षकांचे लक्ष बदली प्रक्रियेकडे खिळले आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी प्रशासनाशी सतत संपर्क साधून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे.