नायलॉन मांजाचा जीवघेणा धोका; स्वारगेट उड्डाणपुलावर दुचाकीस्वार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 15:16 IST2026-01-25T15:15:36+5:302026-01-25T15:16:29+5:30
उड्डाणपुलावरून दुचाकीने प्रवास करत असताना नायलॉन मांज अडकल्याने एका तरुण दुचाकीस्वाराच्या अंगठ्याच्या नसा कापल्या गेल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे.

नायलॉन मांजाचा जीवघेणा धोका; स्वारगेट उड्डाणपुलावर दुचाकीस्वार गंभीर जखमी
धनकवडी -पुणे शहरात नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, स्वारगेट परिसरात घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा या धोकादायक मांजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उड्डाणपुलावरून दुचाकीने प्रवास करत असताना नायलॉन मांज अडकल्याने एका तरुण दुचाकीस्वाराच्या अंगठ्याच्या नसा कापल्या गेल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव संकेत बोथरा (वय ३०, रा. धनकवडी) असे आहे. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सुमारे सहा वाजता संकेत हे दुचाकीवरून देशभक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्याला व उजव्या हाताला पतंगाचा नायलॉन मांज अडकला.
संकेत यांनी मांज बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच वेळी बाजूने भरधाव जाणाऱ्या अन्य वाहनाला देखील तो मांज अडकला. त्यामुळे प्रचंड ताण निर्माण होऊन संकेत यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा अंगठा अर्ध्याहून अधिक कापला गेला असून बोटांच्या नसा देखील तुटल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघातानंतर संकेत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करून उपचार केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, बंदी असतानाही पुणे शहरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारती विद्यापीठ परिसरात एका तरुणीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती. आता स्वारगेटमधील घटना ही त्याच धोक्याची पुनरावृत्ती ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अभिजीत टेंबेकर यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “पतंग उडवणे हा छंद असू शकतो; मात्र नायलॉन मांजामुळे तो प्राणघातक ठरत आहे. अनेक अपघात होऊनही प्रशासन ठोस कारवाई करत नाही. अखेर दोर पतंगाची कापायची की नागरिकांचे आयुष्य?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नायलॉन मांज का ठरतो धोकादायक?
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा चायनीज अथवा नायलॉन मांज अत्यंत तीक्ष्ण असून तो मानवी जीवन, पशू व पक्ष्यांसाठी प्राणघातक ठरतो. याच कारणामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) नायलॉन मांजाचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. तरीही शहरात अशा मांजाचा सर्रास वापर होत असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे.