ना इनाम, ना सेकंद, ना निशाण... तरीही थापलिंग खंडोबा यात्रेत धावले ४०० बैलगाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:46 IST2026-01-06T16:45:54+5:302026-01-06T16:46:37+5:30
या बैलगाडा शर्यतीसाठी कोणतेही इनाम, वेळेची मोजणी किंवा स्पर्धात्मक क्रमांक देण्यात आले नव्हते.

ना इनाम, ना सेकंद, ना निशाण... तरीही थापलिंग खंडोबा यात्रेत धावले ४०० बैलगाडे
निरगुडसर : ना कुठले इनाम, ना वेळेची स्पर्धा, ना विजयाचे निशाण... तरीही श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाच्या जोरावर नागापूर (ता.आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या यात्रेत तब्बल ४०० हून अधिक बैलगाडे धावले पौष पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
शनिवार (दि. ३) आणि रविवार (दि. ४) अशा दोन दिवस चाललेल्या यात्रेत अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासह परिसरातील विविध गावांमधून हजारो भाविकांनी हजेरी लावली. ‘सदानंदाचा येळकोट, खंडोबा महाराज की जय’च्या जयघोषात पारंपरिक बैलगाडी धाव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या बैलगाडा शर्यतीसाठी कोणतेही इनाम, वेळेची मोजणी किंवा स्पर्धात्मक क्रमांक देण्यात आले नव्हते.
केवळ श्रद्धा आणि परंपरेचा मान राखण्यासाठी शेतकरी बांधवांनी स्वखुशीने सहभाग नोंदविला. यात्रेच्या दरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्री क्षेत्र थापलिंग खंडोबाचे दर्शन घेऊन यात्रेस भेट दिली, तसेच नागापूर ग्रामस्थांनी यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची व नियोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत पाहुण्या भाविकांची सेवा केली. यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडली असून, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, युवक मंडळे व स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती, अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.