रिंग रोडच्या कामात निष्काळजीपणा? मुळशीत डंपर घरावर पलटून एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:46 IST2026-02-18T12:45:41+5:302026-02-18T12:46:05+5:30
रस्त्याच्या कामासाठी माती टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि जवळील घरावर पलटला.

रिंग रोडच्या कामात निष्काळजीपणा? मुळशीत डंपर घरावर पलटून एका महिलेचा मृत्यू
मुळशी (पुणे) - मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामादरम्यान बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरावाच्या कामात गुंतलेल्या डंपरचा चालकावरील ताबा सुटून वाहन थेट एका घरावर पलटले. या दुर्घटनेत घरात असलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या कामासाठी माती टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि जवळील घरावर पलटला. अपघाताची तीव्रता इतकी होती की घराचा काही भाग कोसळला आणि आत अडकलेल्या महिलांना ग्रामस्थांनी धाव घेत ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह
प्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, अधिकृत चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.