‘कारखाना बंद पडण्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल’, पृथवीराज जाचक यांची सभासदांना भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:36 IST2025-09-30T13:34:38+5:302025-09-30T13:36:19+5:30
यंदा सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांबरोबरच ‘छत्रपती’ उसाचा पहिला हप्ता देणार आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार चुकीचा झाला.

‘कारखाना बंद पडण्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल’, पृथवीराज जाचक यांची सभासदांना भावनिक साद
बारामती/सणसर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सभासदांना भावनिक साद घालत म्हटले की, “आम्ही सर्व २१ संचालक ‘छत्रपती’चे नोकर आहोत. कारखाना ऐतिहासिक वळणावर आहे. काहीजण खोड्या घालून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक अडचणी असल्या, तरी ‘छत्रपती’ बंद पडू देणार नाही. त्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल.” यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास पुढील गळीत हंगामाबाबत विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी (दि. २७ सप्टेंबर) भवानीनगर (ता. इंदापूर) येथे झालेल्या २०२२ ते २०२५ या तीन आर्थिक वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाचक यांनी सभासदांना कारखान्याच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. “यंदा सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांबरोबरच ‘छत्रपती’ उसाचा पहिला हप्ता देणार आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार चुकीचा झाला. मागील हंगामात ४७ कोटी आणि त्यापूर्वी २९ कोटींचा तोटा झाला. तरीही कारखाना सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले. ऊसतोडणी नियमानुसार होईल आणि हुमणी लागलेल्या, तसेच पूरग्रस्त भागातील उसाला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
सभेत एकूण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये डोर्लेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलसाठी रयत शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेली जागा आणि इमारत हस्तांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अशोक काळे यांनी १२ लाख टन गाळपासाठी आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. बाळासाहेब शिंदे यांनी सणसर ग्रामपंचायतीला २०२३ पर्यंतचा ॲडव्हान्स कर दिल्याबाबत आक्षेप नोंदवला. सतीश काटे आणि रवींद्र टकले यांनी स्क्रॅप विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, तर माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कागदपत्रे तपासण्याची सूचना केली. जाचक यांनीही कोणतीही माहिती देण्यास तयार असल्याचे सांगितले. ॲड. प्रशांत पवार यांनी बाहेरील ऊस देणाऱ्यांवर समान न्यायाने कारवाई करण्याची मागणी केली. ॲड. अमोल सातकर यांनी कार्यकारी संचालकांच्या बंगल्यासाठी तीन सुरक्षारक्षक असल्याकडे लक्ष वेधले.
‘दादा आणि मामा नसते तर कारखाना सुरू होणे अवघड होते’
भाजप नेते तानाजी थोरात यांनी कारखाना राजकीय अड्डा झाल्याचा आरोप करत फ्लेक्सवर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचेच छायाचित्र लावल्याचा आक्षेप घेतला. यावर जाचक यांनी, “दादा’ आणि ‘मामा’ नसते तर कारखाना सुरू होणे अवघड झाले असते. त्यांचे छायाचित्र लावले तर काय बिघडले? ते आपल्या कारखान्याचे सभासद आहेत,” असे उत्तर देत आरोप खोडून काढला.
शासकीय लेखापरीक्षकांकडून साखर स्टॉक तपासणी
सभेत शासकीय लेखापरीक्षकांकडून कारखान्यातील साखरेच्या स्टॉकची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून वसुली करण्यात येईल, असे जाचक यांनी जाहीर केले. तसेच, सतीश काटे यांनी लेखापरीक्षण अहवालात शासकीय नियमांचे पालन न करता सेवक भरती झाल्याचे नमूद असल्याचे सांगितले. यावर माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ठराव न दाखविल्याने लेखापरीक्षकांनी संचालक मंडळाकडे बोट दाखविल्याचे स्पष्ट केले. जाचक यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.