पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज होणार जाहीर; इच्छुकांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:26 IST2025-08-22T14:26:04+5:302025-08-22T14:26:22+5:30
पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असती

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज होणार जाहीर; इच्छुकांची उत्सुकता शिगेला
पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयेगाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि. २२) जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना कशी असणार याबद्दल इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर करण्यात आले होते.
महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने २०१७ आणि सध्या केलेल्या दोन्ही आराखड्यांची पाहणी केली होती. नवीन आराखड्यात गावांचा समावेश झाला असल्याने त्यात काही बदल असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारूप पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर यांनी ४ ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांच्याकडे सादर केली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रत्येक प्रभाग तयार केला की नाही, यांची छाननी नगरविकास विभागाच्या उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपुढे झाली. त्यात काही त्रुटी निघाल्या आहेत. त्यामध्ये नावाचा स्पेलिंगसह अनेक किरकोळ त्रुटी निघाल्या आहेत.
या त्रुटी महापालिकेने दूर केल्या. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे गुरुवारी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर गेले होते. त्यांच्याकडे प्रारूप प्रभाग रचना देण्यात आली आहे. पुणे महापालिका ही प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर करणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा आणि प्रभागनिहाय नकाशा शुक्रवारी सकाळी ११ नंतर पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविल्या जाणार आहे.
कुठला भाग जोडला, कुठला तोडला
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत भाजप आणि शिंदे सेनेने राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जात आहे. त्यात प्रथमच प्रभाग रचना नगरविकास विभागामाफत निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यामुळे प्रभाग रचना कशी झाली आहे, कुठला भाग जोडला, यायाबाबतची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.