टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:02 IST2026-03-19T13:01:40+5:302026-03-19T13:02:29+5:30
- नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत सवाल

टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ?
पुणे : शहरातील अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी विस्कळीत पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारींचा पाढा सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाचला. पाण्यासाठी प्रत्येक महिन्याला टँकरवर लाखो रुपये खर्च होणार असतील, तर महापालिकेचा कर का भरायचा, असा सवाल नागरिक करीत असल्याचे नगरसेवकांनी सभागृहात सांगितले. ज्या परिसरात पाण्याचे टँकर दिसत नव्हते तेथे टँकरचे प्रमाण वाढल्याचे सभासदांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐश्वर्या थोरात यांनी रविवार पेठ व काची आळी भागात कमी दाबाने पाणी मिळत असल्याची तक्रार उपस्थित केली. त्यानंतर बिबवेवाडी भागात पंधरा ते वीस मिनिटे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रूपाली धाडवे यांनी केली. ‘प्रभाग क्रमांक १२ मध्ये नागरिकांना दररोज पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही,’ असे नगरसेविका पूजा जागडे म्हणाल्या. नळ असूनही पाणी उपलब्ध नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाल्याचे अश्विनी भंडारे यांनी सांगितले. कासेवाडी, लोहियानगर आणि डायस प्लॉट भागात दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार मृणाल कांबळे यांनी केली.
‘महापालिकेकडे नागरिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी नाही. मात्र, प्रशासनाकडून गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता दिली जात आहे. आताच कमी दाबाने पाणी मिळत असेल, तर नव्याने होणाऱ्या सोसायट्यांना पाणीपुरवठा कुठून करणार ?,’ असा प्रश्न शैलजित बनसोडे यांनी विचारला. प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांवर दूषित पाणी पोहोचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नितीन गावडे यांनी सांगितले. अजय खेडेकर यांनी प्रभागातील पाणी पंपिंग व दबाव अपुरा असल्याचे त्यांनी सांगितले.
माणिकबाग सन सिटी प्रभागात समान पाणीपुरवठा योजना आणि पाणी टाकी तयार असतानाही पुरवठा सुरळीत होत नसल्याचे सचिन मोरे यांनी सांगितले. शहरातील काही भागांना दूषित पाणी मिळते, तर काही प्रभागांना आतापासूनच टँकरवर अवलंबून राहावे लागते. प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुधारण्यासाठी टाक्यांचे काम पूर्ण करावे, दूषित पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी,’ असे आदेश उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिले.