पाठीवर सळईने चटके; मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:34 IST2025-08-24T19:30:32+5:302025-08-24T19:34:15+5:30
गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणि गवत आणणे, गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली.

पाठीवर सळईने चटके; मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील कडूस येथून अडीच वर्षांपूर्वी प्रवीण ऊर्फ नागेश मधुकर टोके (वय ४३) या मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून त्याला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे एका व्यक्तीकडे सोडण्यात आले होते. या प्रकरणी बंडू सहादू साळुंके (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड), सचिन रघुनाथ चव्हाण (रा. कडूस, ता. खेड) आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२३ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत प्रवीण टोके याला डांबून ठेवण्यात आले. त्याच्याकडून गुलामाप्रमाणे वागणूक देत वेठबिगारी करवून घेण्यात आली.
यामध्ये गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणि गवत आणणे, गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली. काम न केल्यास त्याला मारहाण करून पाठीवर, हातावर आणि कानावर गरम सळईने चटके देण्यात आले. प्रवीण यांचा भाऊ प्रदीप मधुकर टोके (रा. गुंजवठा चास, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.