माऊलींचा सोहळा पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:07 IST2025-07-15T13:07:05+5:302025-07-15T13:07:23+5:30
नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले.

माऊलींचा सोहळा पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
नीरा : आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर आज मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज आहे. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा २७८ वा पालखी सोहळा यावर्षी संपन्न होत आहे. सोमळवार (दि.१४) रोजी सातारा जिल्हयातील पाडेगाव येथे मुक्काम होता. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. पावसाच्या सरी अंगावर झेलत सकाळी आठ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदितील स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, चोपदार व त्यांच्या सहकार्यांनी 'ज्ञानोबा माऊली.. ज्ञानोबा माऊली' च्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले.
माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्या सोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक व तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावरील रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथा मागील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात पावसाच्या सरीत मोठ्या उत्साहात व शांतते पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत माऊलींची पालखी विठ्ठल मंदिरात साडेनऊच्या सुमारास विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्त होणार आहे.
नीरा नदीच्या किनाऱ्यावरील पालखीतळ व छत्रपती शिवाजी चौकात नीरा सह परिसरातील भाविकांनी स्वागत केले. अहिल्याबाई होळकर चौकातून नीरेतील युवकांनी रथातील पालखी खांद्यावर घेऊन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवली. यावेळी नीरा सह परिसरातील भाविकांनी पालखीतील माऊलींच्या पादुकांवर डोके ठेवून मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. यावर्षी दर्शनासाठी अभुतपुर्व गर्दी होती. त्यामुळे पुरुषांची व महिलांची अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या.