भेकराईनगरमध्ये फ्लॅटला भीषण आग; २० लाखांचे फर्निचर जळून खाक, कामगारांचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:55 IST2026-01-21T09:54:32+5:302026-01-21T09:55:06+5:30
आज सकाळी इमारतीच्या परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या

भेकराईनगरमध्ये फ्लॅटला भीषण आग; २० लाखांचे फर्निचर जळून खाक, कामगारांचे प्राण वाचले
फुरसुंगी : भेकराईनगर येथील ग्रीन काऊंटी फेज-वन या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०५ मध्ये आज (दि.21) सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सिलेंडरमधील गॅस लिकेजमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, नव्याने बसवण्यात आलेले सुमारे २० लाख रुपये किमतीचे फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळी इमारतीच्या परिसरातून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. तत्काळ बाळासाहेब लोळे, संजय थोरात, सागर पिलाने, दीपक भोसले, विकास गायकवाड आणि उमेश पवार यांनी प्रसंगावधान दाखवत वर धाव घेतली. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत अडकलेल्या फर्निचरचे काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढले. दरवाजाजवळ आगीचा प्रचंड भडका उडाल्याने हे कामगार मदतीच्या अपेक्षेने गॅलरीत थांबले होते.
माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी या फ्लॅटची पूजा असल्याने फर्निचरचे काम सुरू होते. फर्निचर करणारे कामगार शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत होते. सकाळी चहा करण्यासाठी गॅस सुरू करताच गॅस लिकेजमुळे अचानक आग लागल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवनांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
या फ्लॅटचे मालक विपुल जैन असून, घटनेनंतर नगराध्यक्ष संतोष सरोदे, नगरसेवक गणेश ढोरे आणि रमेश निवंगुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.