Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 21:04 IST2025-08-23T21:03:36+5:302025-08-23T21:04:51+5:30

आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला.

pune news Leaders are responsible for traffic jams; Raj Thackeray reveals the 'secret' of traffic jams | Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज'

Pune Traffic : कोंडीला नेतेच जबाबदार; राज ठाकरेंनी उलगडले वाहतूक कोंडीचे 'राज'

पुणे : ‘सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे, नेतेच याला जबाबदार आहेत. त्यामुळेच मी मुंबईतही गणपती दर्शनाला कधी जात नाही. आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो’ अशा उद्विग्न शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीबाबतचा आपला संताप व्यक्त केला. बैठकीसाठी मध्यवर्ती भागातील सावित्रीबाई फुले स्मारक निवडल्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.

बैठकस्थळी येण्याआधी राज ठाकरे रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी या पदाधिकाऱ्याच्या गणेशमूर्ती विनामूल्य देण्याच्या स्टॉलवर गेले होते. तिथे ते वाहतूक कोंडीत अडकले. तिथून सुटका झाल्यावर ते गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी गेले. तिथेही त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तिथून पुढच्याच चौकात असलेल्या बैठकस्थळी म्हणजेच सावित्रीबाई फुले स्मारकात येतानाही त्यांचे वाहन एकदोन ठिकाणी अडकून पडले.



या सगळ्याचा उद्वेग त्यांनी बैठकीत बोलताना थेटपणे व स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केला. असे मध्यवर्ती भागातील स्थळ बैठकीसाठी निवडले कोणी? असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर ते म्हणाले, ‘वाहतूक कोंडी ही आता सर्वच शहरांमधील समस्या झाली आहे. नेते आपापले दौरे करून त्यात आणखी भर टाकतात. याच कारणामुळे मी मुंबईत गणेशोत्सवामध्ये कधीही कोणत्या गणपती दर्शनासाठी जात नाही. त्याचे आशीर्वाद घ्यायचे व नंतर लोकांच्या शिव्या खायच्या याला काहीच अर्थ नाही.’

बैठकीनंतर राज ठाकरे यांच्याबरोबर बोलताना एका स्थानिक पदाधिकाऱ्याने अन्य एकदोन ठिकाणाचे महापालिकेचे सभागृह उपलब्ध नव्हते. हे मध्यवर्ती भागातील आहे, मात्र बैठक व तुमची उपस्थिती यामुळे वातावरण निर्मिती होते, त्याचा विचार करून हे सभागृह घेतले असे सांगत समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पुढील वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगण्यासही हा पदाधिकारी विसरला नाही.

Web Title: pune news Leaders are responsible for traffic jams; Raj Thackeray reveals the 'secret' of traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.