पुणे पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:20 IST2026-04-05T17:19:59+5:302026-04-05T17:20:20+5:30

पुणे : पुण्यात फूल विक्रेत्या महिलेचा बळी गेल्यानंतर पीएमसीच्या अधिकाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले असून आता अवकाळी आणि पुढील येणाऱ्या ...

pune news late warning; Survey of dangerous trees begins after 'that' woman dies in Pune | पुणे पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू

पुणे पालिकेला उशिरा सुचले शहाणपण; धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू

पुणे : पुण्यात फूल विक्रेत्या महिलेचा बळी गेल्यानंतर पीएमसीच्या अधिकाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचले असून आता अवकाळी आणि पुढील येणाऱ्या पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पीएमसीने शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि छाटणी मोहीम सुरू केली आहे.

मुळात 'लोकमत'ने फर्ग्युसन महाविद्यालयाशेजारी ४ मार्च रोजी घडलेल्या घटनेनंतर पीएमसीच्या उद्यान व वृक्ष लागवड तथा वृक्ष संवर्धन व जतन अधिकाऱ्यांना जागृत करण्यासाठी ५ मार्च रोजी शहरातील धोकादायक झाडांबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, तेव्हा उद्यान विभागाने तत्परता दाखवली नाही.

दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसात सिंहगड रोडवरील एका मंदिराच्या पायथ्याशी फूल विक्री करणाऱ्या रंजना नवनाथ गिरी (वय ६०) यांच्या अंगावर वडाचे झाड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर पुणेकरांनी संताप व्यक्त करताच धास्तावलेल्या पीएमसी अधिकाऱ्यांनी आजपासून शहरातील सर्व धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

उद्यान अधीक्षक सुटीवर; सहायक उद्यान अधीक्षक अनभिज्ञ

एकीकडे शहरात दुर्दैवी घटना घडत असताना उद्यान अधीक्षक सुटीवर आहे, तर सहायक उद्यान अधीक्षक रत्नाकर कोरडे यांनी सन २०१६ मध्ये वृक्षगणना झाली होती, असे मोघम उत्तर देत त्यांना धोकादायक झाडांची माहिती देता आली नाही, त्यामुळे या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उपायुक्त उतरले रस्त्यावर

धोकादायक झाडांच्या सर्वेक्षणासाठी उद्यान विभागातील कृषी सहायक, उपअधीक्षक, सहायक अधीक्षक तसेच कृषी कर्मचाऱ्यांचा आणि सर्व सहायक आयुक्तांचा फौजफाटा घेऊन उपायुक्त माधवराव जगताप यांनी धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या मोहिमेत कुजलेली, वाकलेली आणि वीज वाहिन्यांच्या जवळची झाडे ओळखून छाटली जात आहेत.

अवकाळी पावसाळ्यात आणि आगामी पावसाळ्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपायुक्त माधवराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग तसेच सहायक आयुक्तांच्या मार्फत धोकादायक, अतिधोकादायक आणि वीज वाहिन्यांच्या खालची झाडे चिन्हांकित केली जात आहेत. धोकादायक फांद्यांची छाटणी आणि मृत झाडे मुळासकट काढली जात आहेत.

दरम्यान, पुण्यातील गृहनिर्माण संस्था, सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कार्यालयाच्या आवारातील धोकादायक झाडे स्वतःहून छाटणी करण्याचे फर्मान काढत त्यांना प्रभागनिहाय मान्यता देखील देण्यात येत आहे, अन्यथा पीएमसीने त्यावर कारवाई करण्याचा दंडुकाही ठोकला आहे. दरम्यान, आपल्या भागातील धोकादायक झाडांची माहिती देण्यासाठी उद्यान विभागाकडे तक्रारी दाखल करायचे आवाहन केले आहे.

पुण्यात वाढत्या शहरीकरणामुळे व प्रकल्पांमुळे रस्त्यांच्या कामात झाडांची मुळे कापली जाऊन झाडे कमकुवत झाल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यात धोकादायक झाडांची आकडेवारी उद्यान विभागाच्या दप्तरी असताना प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. मार्च-एप्रिलदरम्यान अवकाळी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवामान खात्यामार्फत वेळोवेळी पीएमसी प्रशासनाला अवगत केले जात असताना शहरात झाडे उन्मळून पडतात आणि यात अनेकांचा बळी जाण्याच्या घटना नेहमीच्या असताना महापालिका प्रशासन मात्र बळी गेल्यानंतर धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करते, पण अवकाळी पावसाळापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी केली जात नाही, अशी टीका पुणेकरांमध्ये सुरू आहे.

शहरातील सर्वच भागांतील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. अतिधोकादायक आणि मृत झाडे काढण्यात येत आहेत. वाकलेल्या व अतिभार असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केलेली आहे. जी जाडे चांगली आहेत पण रस्त्याच्या दिशेने वाकली आहेत अशा झाडांपासून धोका टाळण्यासाठी सुरक्षा जाळ्या लावल्या जात आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी सगळीकडे उपाययोजना सुरू केल्या आहेत.  - माधवराव जगताप, उपायुक्त, पीएमसी. 

Web Title : पुणे नगरपालिका जागी: खतरनाक पेड़ों का सर्वेक्षण शुरू

Web Summary : फूल विक्रेता की मौत के बाद, पुणे नगर निगम (पीएमसी) ने खतरनाक पेड़ों का सर्वेक्षण और छंटाई शुरू की। पहले चेतावनी को अनदेखा करने के बाद सार्वजनिक आक्रोश ने कार्रवाई को प्रेरित किया। पीएमसी अब भविष्य में दुर्घटनाओं को रोकने के लिए शहर भर में खतरनाक पेड़ों की पहचान कर रहा है।

Web Title : Pune Municipality Finally Acts: Survey of Dangerous Trees Begins

Web Summary : After a flower vendor's death, Pune Municipal Corporation (PMC) initiated a survey and trimming of dangerous trees. Public outrage spurred the action after prior warnings were ignored. The PMC is now identifying and addressing hazardous trees across the city, including private properties, to prevent future accidents.