खरिपात नुकसान ४८ लाख हेक्टर, भरपाई २२०४ कोटींची, सप्टेंबरचे पंचनामे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:47 IST2025-09-28T13:45:40+5:302025-09-28T13:47:39+5:30
केवळ सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २२ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

खरिपात नुकसान ४८ लाख हेक्टर, भरपाई २२०४ कोटींची, सप्टेंबरचे पंचनामे सुरू
पुणे : राज्यात खरीप हंगामात २७ सप्टेंबरपर्यंत एकूण ४७ लाख ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारीपासून ऑगस्टपर्यंत अवकाळी, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने ३७ लाख २४ हजार शेतकऱ्यांना चार वेळा आतापर्यंत २ हजार ५४२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यात जून ते ऑगस्ट या खरिपाच्या तीन महिन्यांत एकूण २५ लाख ६८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीपोटी २ हजार २०४ कोटी मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे ३१ जिल्ह्यांत पिकांना फटका बसला असून जालना जिल्ह्यातील पंचनामे अजुनही सुरू आहेत. केवळ सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २२ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
राज्यात फेब्रुवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात राज्यातील सर्वच ३४ जिल्ह्यांतील पिकांना फटका बसला होता. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १ लाख ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे यात नुकसान झाले. सुमारे चार लाख शेतकरी यात बाधित झाले होते. पंचनाम्यानुसार त्यांना ३३७ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम २२ जुलै आणि १२ सप्टेंबर या दोन टप्प्यांत देण्यात आली आहे. त्यानंतर जूनपासून सुरू झालेल्या खरीप हंगामात २७ सप्टेंबरपर्यंत एकूण ४७ लाख ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात २५ लाख ६८ हजार हेक्टर तर एकट्या सप्टेंबर महिन्यात तब्बल २२ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
जून महिन्यात राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १ लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. याचा १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार यात ११४ कोटी ९५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, राज्य सरकारने आतापर्यंत ६ जून व १२, १७ तसेच २३ जून रोजी १०१ कोटी ८८ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जुलै महिन्यात २१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसला. यात १ लाख ४४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका २ लाख १ हजार शेतकऱ्यांना बसला. पंचनामे केल्यानंतर १२८ कोटी ७५ रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्यापैकी राज्य सरकारने १२, १७ व २३ सप्टेंबर रोजी ११७ कोटी ८२ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.
तर ऑगस्ट महिन्यात ३१ जिल्ह्यांतील २९ लाख ९१ हजार शेतकऱ्यांच्या २४ लाख १३ हजार हेक्टरवरील शेतीला अतिवृष्टीचा दणका बसला आहे. यात ३० जिल्ह्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, जालना जिल्ह्यात अजूनही या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांच्या आधारे २ हजार ८८ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यापैकी १ हजार ९८४ कोटी ९० लाख रुपयांची भरपाई १२, १७ व २३ सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, एकट्या सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत २४ जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २२ लाख २७ हजार ४६६ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक ५ लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्र केवळ बीड जिल्ह्यातील आहे. तर त्या खालोखाल ३ लाख ५१ हजार ४३७ हेक्टर क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. अहिल्यानगरमध्येही ३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
अशी दिली मदत
महिना जिल्हे क्षेत्र (हे.) शेतकरी (लाखांत) मदत (कोटींमध्ये)
जून २५--१.११--१.३४--१०१.८८
जुलै २१--१.४४--२.०१--११७.८२
ऑगस्ट ३१--२४.१३--२९.९१--१९८४.९०
कृषी संचालक वेगवेगळ्या भागात जाऊन याबाबत पाहणी करत आहेत. सप्टेंबरचा पंचनाम्यांचा अहवाल पाठविण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. - रफिक नाईकवडी, संचालक