पुणे शहरासाठी 'मुळशी'तून ७ टीएमसी पाणी देण्यास 'जलसंपदा'कडून मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:01 IST2025-12-25T13:00:51+5:302025-12-25T13:01:27+5:30
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवणार

पुणे शहरासाठी 'मुळशी'तून ७ टीएमसी पाणी देण्यास 'जलसंपदा'कडून मान्यता
पुणे :पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली आहे. याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर महापालिकेला या पाण्याचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे पुणे शहराला मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यानुसार आवश्यक असलेले पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरता येईल, असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे सात टक्के पीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंतीदेखील यात करण्यात आली आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अन्वेषण अहवाल मान्य करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे.
मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते. प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा १८.४७ टीएमसी इतका आहे, तर मृत साठा ८.१२ टीएमसी इतका आहे. या पाण्यातून तीनशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सहा संच वापरण्यात येत आहेत. मुळशी प्रकल्पाच्या भीरा जलविद्युत केंद्रातील २४ टीएमसी वार्षिक पाणीवापरापैकी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या १७ टीएमसी पाण्याद्वारे जास्तीतजास्त वीजनिर्मिती करून उर्वरित सात टीएमसी पाणीवापर १५ ऑक्टोबरच्या १८.५० टीएमसी पाणीसाठ्यातून आठ महिन्यांमध्ये वीजनिर्मितीसाठी करता येणार आहे. तर १.६५ टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी व उर्वरित ९.८५ टीएमसीपैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक सात पीएमसी पाणी पूर्वेकडे वळवता येणार असल्याचा अहवाल मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी दिला आहे.
या सात टीएमसी पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने दोन पर्याय दिले आहेत. पुणे महापालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्य सरकारकडून या पाणीवापराची मान्यता घेऊन सध्याच्या पाइपलाइनच्या जागेवर स्वखर्चाने मुळशी प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन तयार करणे व त्याचा वापर करणे. तर दुसरा पर्याय मुळशी ते खडकवासला धरणापर्यंत ३० किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून हे पाणी खडकवासला जलाशयात आणणे व त्याचा वापर करणे असा दिला आहे.
मुळशी धरणातून पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. पुणे शहराची तसेच पिंपरी चिंचवड शहराची सध्याची गरज तीस टीएमसी असून लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळेच टाटांच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी द्यावे. पाण्याऐवजी सौरऊर्जा आणि अणुऊर्जा यांसारखे तंत्रज्ञानाचा वापर करून वीज तयार करता येईल, असा पर्याय पवार यांनी राज्य सरकारला सुचविला होता.
मुळशीतील अतिरिक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ मार्च रोजी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी विभागासोबत बैठका घेऊन १३ ऑगस्ट रोजी मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता हा प्रस्ताव कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.