७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:30 IST2025-08-19T14:26:56+5:302025-08-19T14:30:58+5:30

- पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही. भरपावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊण तास पायपीट करावी लागली.

pune news Incident at Waghmachiwadi in Bope village of Bhor taluka, taken to hospital after trampling through mud | ७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट

७९ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही रस्ता नाही; जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट

भोर : स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण झाली, तरीही भोर तालुक्यातील दुर्गम बोपे गावातील वाघमाचीवाडी कचरे वस्तीला अद्याप पक्का रस्ता नाही. यामुळे जखमी वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना ३ किलोमीटरपर्यंत चिखल तुडवत झोळीत टाकून पायपीट करावी लागली.

भोरपासून ७० किलोमीटर अंतरावर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर भोर आणि वेल्हे तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या बोपे गावातील वाघमाचीवाडी कचरे वस्तीतील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कचरे (वय ६५) हे गुरे चारण्यासाठी रानात गेले असताना घसरून पडले. यात त्यांचा पाय मोडला. गावाला पक्का रस्ता नसल्याने त्यांना झोळीत टाकून ३ किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले. पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही. भरपावसात ग्रामस्थांना चिखल तुडवत तब्बल पाऊण तास पायपीट करावी लागली. मुख्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर खासगी वाहनाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या अभावामुळे उपचाराला उशीर झाला.

कच्चा रस्ता उपलब्ध
कचरे वस्तीला पक्का रस्ता नसल्याने आजारी वृद्ध आणि बालकांना रुग्णालयात नेण्यासाठी नेहमीच अशा कष्टप्रद पायपिटीला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने दळणवळणाची समस्या गंभीर बनते. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते, असे वस्तीतील एका ग्रामस्थाने सांगितले. डोंगरात वसलेल्या बोपे-कुंबले गावातील या वस्तीला जाण्यासाठी केवळ कच्चा रस्ता उपलब्ध आहे.

Web Title: pune news Incident at Waghmachiwadi in Bope village of Bhor taluka, taken to hospital after trampling through mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.