गे डेटिंग अॅपवरून ओळख;व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लूट;पुण्यात तरुणाला कसं फसवलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:31 IST2025-07-17T10:29:54+5:302025-07-17T10:31:01+5:30
आरोपीने पीडितावर अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून व्हिडीओ रेकॉर्ड केला.

गे डेटिंग अॅपवरून ओळख;व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लूट;पुण्यात तरुणाला कसं फसवलं?
पुणे - नांदेड सिटी परिसरात गे डेटिंग अॅप (गिन्डर) वरून ओळख करून एका व्यक्तीला धमकावत जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे.
या घटनेबाबत संभाजी कदम पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने पीडिताची गिन्डर अॅपवरून ओळख करून त्याला नांदेड सिटी गेटजवळ चूल आंगण हॉटेलजवळ बोलावले. त्यानंतर आरोपी व त्याचा मित्र पीडिताला मारुती सुझुकी गाडीतून प्राईड सिटीजवळील मोकळ्या मैदानात घेऊन गेले. आरोपीने पीडितावर अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून व्हिडीओ रेकॉर्ड केला.
दरम्यानचा व्हिडीओ घरच्यांना पाठविण्याची धमकी देत आरोपींनी १०,००० रुपयांची मागणी केली. पीडिताने नकार दिल्यावर आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावला आणि त्यावरून गुगल पे व फोन पे द्वारे १०,००० रुपये ट्रान्सफर केले. तसेच घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत पीडित व्यक्तीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी रॉबिन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय २७, रा. गांदळफाटा, सिंहगड रोड, पुणे) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार ओकार मंडलिक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.