पोटगीची थकीत रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:01 IST2025-03-26T11:01:09+5:302025-03-26T11:01:42+5:30
पतीने पोटगीची किमान १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम भरली तरच त्याची सुटका केली जाईल

पोटगीची थकीत रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास
पुणे : पत्नीला दरमहा अंतरिम पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला होता. मात्र, पतीने पत्नीला पोटगीची रक्कम न दिल्याने पत्नीचे जगणे बिकट झाले होते. तिने प्रलंबित पोटगीसाठी न्यायालयात पुन्हा अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलिसांनी पतीला न्यायालयात हजर केले. मात्र, पोटगीची १४ लाख रुपयांची थकीत रक्कम भरण्यास पतीने पुनश्च नकार दिल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खंदारे यांनी पतीला एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
पतीने पोटगीची किमान १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम भरली तरच त्याची सुटका केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ॲड. जयपाल पाटील आणि ॲड. सुखदेव सानप यांनी न्यायालयात पत्नीची बाजू मांडली.
स्मिता आणि राकेश (नावे बदललेली) यांचे लग्न १७ जानेवारी २०१३ मध्ये झाले. दोघांना एक मुलगी आहे. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून पती तिला कायम टोचून बोलायचा. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करण्याबरोबरच जिवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. त्यामुळे स्मिता राकेशपासून वेगळी राहू लागली. स्मिताने कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. त्यानुसार २०२२ मध्ये न्यायालयाने पत्नीला २७ हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली. तरीही पतीने तिला पोटगीची रक्कम दिली नाही. या निर्णयाविरुद्ध पतीच्या वकिलांनी अपील दाखल केल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र असे कोणतेही अपील केल्याचे आढळले नाही. ही पोटगीची थकीत रक्कम १४ लाखांच्या घरात पोहोचली. त्यामुळे पत्नीने थकीत पोटगीची रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने पतीला समन्स पाठविले. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले.
पोलिसांनी पतीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी पतीला थकीत रक्कम भरण्याबाबत विचारणा केली. मात्र, पतीने रक्कम भरण्यास नकार दर्शविला. त्यामुळे न्यायालयाने पतीला एक महिन्याचा साधा कारावास सुनावत त्याची कारागृहात रवानगी केली.