बारामतीच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवा ढासळल्या; उपकेंद्रे बंद, एकाच रुग्णवाहिकेवर २५ गावांचा भार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:24 IST2026-03-21T10:23:46+5:302026-03-21T10:24:47+5:30
उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.

बारामतीच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवा ढासळल्या; उपकेंद्रे बंद, एकाच रुग्णवाहिकेवर २५ गावांचा भार
-महेश जगताप
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवांची अवस्था सध्या चिंताजनक झाली असून, परिसरातील अनेक आरोग्य उपकेंद्रे आणि होळ प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वारंवार बंद राहत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. परिणामी रुग्णांना साध्या आजारांसाठीही खाजगी रुग्णालये किंवा बारामती येथील शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अनेकदा औषधी आणि गोळ्यांचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना किरकोळ आजारांसाठीही बारामती गाठावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरील विश्वास कमी होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वी महिलांच्या प्रसूती होत असत. मात्र, सध्या ही सुविधा बंद झाल्याने गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी थेट बारामतीला जावे लागत आहे, तसेच आरोग्य केंद्रातील ॲम्ब्युलन्स सेवादेखील अनेक वर्षांपासून व्यवस्थित उपलब्ध नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांवर इतर प्रशासकीय कामांचा भार असल्यामुळे ते अनेकदा केंद्रात अनुपस्थित राहतात. त्यामुळे आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे सरकारकडून गरीब रुग्णांसाठी विविध आरोग्य योजना राबवल्या जात असताना बारामतीच्या पश्चिम भागात मात्र त्यांचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा कमकुवत झाल्याने खाजगी रुग्णालयांचा व्यवसाय वाढत असून, सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
दरम्यान, वाघळवाडी (सोमेश्वरनगर) येथे ६४ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २७ सप्टेंबर रोजी पार पडले होते, तसेच सोमेश्वरनगर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रालाही मान्यता मिळाल्याने भविष्यात बारामतीच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
होळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दोन रुग्णवाहिका असल्या तरी त्यापैकी एक अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. परिणामी एकाच रुग्णवाहिकेवर सुमारे २५ गावांचा आरोग्य सेवेसाठी अवलंबून राहावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वाघळवाडीत १०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीला वेग
वाघळवाडी (सोमेश्वरनगर) येथे ६४ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. हे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर, तसेच सोमेश्वरनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू झाल्यानंतर भविष्यात बारामतीच्या पश्चिम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.