HSC Hall Ticket 2026: बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट १२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:48 IST2026-01-10T14:46:52+5:302026-01-10T14:48:28+5:30
Maharashtra HSC 12th Class Hall Ticket 2026: बारावीच्या परीक्षेला आता काही दिवसच शिल्लक राहिले असून तोंडी व लेखी परीक्षा जवळ आल्या आहेत.

HSC Hall Ticket 2026: बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट १२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध
Maharashtra HSC Exam Hall Ticket: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सोमवारी (दि. १२ ) हॉल तिकिटे डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्ध परिपत्रकाद्वारे दिली आहे.
बारावीच्या परीक्षेला आता काही दिवसच शिल्लक राहिले असून तोंडी व लेखी परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांमार्फत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांच्या प्रिंटआऊट उपलब्ध करून दिल्या आहेत. हॉल तिकीट देताना शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे.
हॉल तिकिटावर नाव, आईचे नाव, जन्मतारीख आदी तपशीलात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त्या केवळ ऑनलाईन पद्धतीनेच कराव्या लागणार आहेत. यासाठी ‘ॲप्लिकेशन करेक्शन’ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत शुल्क भरून दुरुस्तीचा अर्ज विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. ‘करेक्शन ॲडमिट कार्ड’ या लिंकद्वारे सुधारित हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे. विषय किंवा माध्यम बदलायचा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळाशी प्रत्यक्ष संपर्क साधून दुरुस्त्या करून घ्याव्यात.
हॉल तिकिटावरील छायाचित्र सदोष असल्यास विद्यार्थ्याचा फोटो हॉल तिकिटावर चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. एखाद्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंटआऊट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावे, अशाही सूचना देण्यात आले आहेत.