वाढती लोकसंख्या, अपुरी यंत्रणा; शिरूरमध्ये आरोग्य व्यवस्थेची कोंडी, नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:02 IST2026-03-25T15:01:50+5:302026-03-25T15:02:31+5:30

- पाच ग्रामीण रुग्णालये, आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे; इमारतींची दुरवस्था, साधनसामग्रीची कमतरता आणि निर्णय प्रक्रियेत दिरंगाई

pune news growing population, inadequate system; Health system in Shirur is in crisis, citizens turn to private hospitals | वाढती लोकसंख्या, अपुरी यंत्रणा; शिरूरमध्ये आरोग्य व्यवस्थेची कोंडी, नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळले

वाढती लोकसंख्या, अपुरी यंत्रणा; शिरूरमध्ये आरोग्य व्यवस्थेची कोंडी, नागरिक खासगी रुग्णालयांकडे वळले

- खंडू जगताप
 
शिरूर :
शिरूर तालुक्यात पाच ग्रामीण रुग्णालये, आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४२ आरोग्य उपकेंद्रांचे विस्तृत जाळे असले तरी वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तारामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी पदे रिक्त, इमारतींची दुरवस्था, साधनसामग्रीची कमतरता आणि निर्णय प्रक्रियेत होणारी दिरंगाई यामुळे नागरिकांना महागडी असतानाही खासगी रुग्णालयांकडे वळावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरूर तालुक्यात मांडवगण फराटा, निमोणे, करडे, रांजणगाव गणपती, केंदूर, कवठे, टकळी हाजी आणि तळेगाव ढमढेरे येथे आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, त्याअंतर्गत ४२ आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. लसीकरण, माता-बाल मृत्यू रोखणे, कुपोषण प्रतिबंध, प्रथमोपचार, श्वानदंश-सर्पदंश उपचार, उच्च रक्तदाब मधुमेह तपासणी, ईसीजी, महिलांच्या प्रसूती तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशा सेवा नियमित दिल्या जातात. 

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दरमहा सरासरी ५० पेक्षा अधिक प्रसूती होत असून, दर पंधरवड्याला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, या यंत्रणेत ९३ पदे रिक्त असल्याने सेवांवर मोठा परिणाम होत आहे. मंजूर १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १७ पदे भरलेली असली तरी ४८ आरोग्य सेविका, १२ आरोग्य सेवक, १० परिचर आणि १३ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्याने रात्री आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात नव्याने बांधलेली काही प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज असली तरी अनेक केंद्रांची इमारत जीर्ण झाली आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था अपुरी आहे, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, परिसरात कचरा साचलेला दिसतो. 

काही ठिकाणी सुरक्षा भिंत नसल्याने मोकळ्या जागांचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास येते. कर्मचारी निवासस्थानेही राहण्यायोग्य नसल्याने अनेक कर्मचारी अन्यत्र राहणे पसंत करतात. तालुक्यात शिरूर, न्हावरे, शिक्रापूर, पाबळ आणि मलठण येथे पाच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालये असून, येथे दररोज सरासरी १ हजाराहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. दरमहा सुमारे ६० प्रसूतीही होतात. मात्र येथेही कर्मचारी आणि तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे उपलब्ध यंत्रसामग्रीचा पूर्ण उपयोग होत नाही. काही केंद्रांमध्ये क्ष-किरण यंत्र आणि रक्त तपासणीची साधने असूनही तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांना शहरातील खासगी प्रयोगशाळांकडे जावे लागते. 

औषध संपल्याने गदारोळ

आरोग्य प्रशासनाकडून सर्व केंद्रांना पुरेसा औषधसाठा असल्याचा दावा केला जात असला तरी काही ठिकाणी रुग्णांना औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. मलठण ग्रामीण रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी 'औषध साठा संपला आहे' असा फलक झळकल्याने गदारोळ झाला होता. 

अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर अद्याप बंदच

रांजणगाव आणि कारेगाव परिसरातील औद्योगिक वसाहती तसेच पुणे-अहिल्यानगर महामार्गामुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मात्र जखमी प्रवाशांसाठी अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर अद्याप सुरू झालेले नाही. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आयसीयू आणि डायलिसिस सेंटरचीही तालुक्यात आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींकडून आरोग्य सुविधा सुधारण्याची आश्वासने दिली जात 3 असली तरी निधी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये दरी असल्याची टीका होत आहे. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने रिक्त पदे तातडीने भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान रिक्त पदे कथी भरण्यात येणार हे अद्यापही स्पष्ट नाही. 

'भी सहा दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. शिरूर तालुका मोठा असून, उपलब्ध साधनसामग्रीत सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे. रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून, इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.' - डॉ. पायल राठोड, तालुका आरोग्य अधिकारी

 

'ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे अत्यंत उपयुक्त आहेत. मात्र कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयांविषयी लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. - अनिल शेलार, वडगाव रासाई 

Web Title : बढ़ती आबादी से शिरूर की स्वास्थ्य व्यवस्था पर दबाव; निजी अस्पतालों की ओर रुख।

Web Summary : शिरूर की स्वास्थ्य प्रणाली बढ़ती आबादी, कर्मचारियों की कमी और अपर्याप्त सुविधाओं से जूझ रही है। ग्रामीण निवासी इन मुद्दों के कारण निजी अस्पतालों में इलाज कराने के लिए तेजी से जा रहे हैं, जो अधिक महंगा है। तत्काल बुनियादी ढांचे और कर्मचारियों के उन्नयन की आवश्यकता है।

Web Title : Growing Population Strains Shirur's Healthcare; Citizens Turn to Private Options.

Web Summary : Shirur's healthcare system struggles with rising population, staff shortages, and inadequate facilities. Rural residents are increasingly seeking treatment at private hospitals due to these issues, despite the higher costs. Urgent infrastructure and staffing upgrades are needed.