पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित,रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:55 IST2025-08-22T15:46:33+5:302025-08-22T15:55:56+5:30
पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित, रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश, पीएमआरडीएला २०० कोटींचा निधी, डीपीसीतूनही ३५ कोटी देणार

पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग निश्चित,रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपूर्वी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे :पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्यासाठी आयोजित केलेल्या पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेचा मार्ग अंतिम करण्यात आला असून, पुणे, पिंपरी महापालिका, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार या यंत्रणांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासाठी पीएमआरडीला २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अन्य यंत्रणा आपापल्या निधीतून रस्त्यांची कामे करतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
विधानभवनात आयोजित प्रशासकीय कामांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टू स्पर्धेच्या मार्गासाठी एक रंगसंगती ठेवण्यात आली असून रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात नियोजन केले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ३० नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीएमआरडीए हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीए एकत्रित रस्त्यांची कामे पूर्ण करतील. यासाठी निविदा काढाव्या लागणार आहेत. स्पर्धेसाठी वेळ कमी शिल्लक राहिल्याने निविदा काढल्यानंतर देण्यात येणारा १५ दिवसांचा कालावधी कमी पडत असल्यास सात दिवसांचा करण्यात येईल.”
निधी खर्चासंदर्भातही पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राज्य सरकारकडून या कामासाठी पीएमआरडीएला २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे हद्दीत येत असलेल्या कामांसाठी ३५ कोटी रुपये देण्यात येतील, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका आपापल्या हद्दीत स्वतःच्या निधीतून खर्च करतील. तर पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद राज्य सरकारकडून केली जाणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. या स्पर्धेसंदर्भात आता यापुढे दर पंधरा दिवसांनी आढावा बैठक घेतली जाणार आहे. आज झालेल्या आढावा बैठकीतील कामांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याचा आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.