शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मिळविण्याचे सरकारचा प्रयत्न : दत्तात्रय भरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:18 IST2025-09-27T13:17:28+5:302025-09-27T13:18:25+5:30
आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांसाठी मदतनिधी मिळविण्याचे सरकारचा प्रयत्न : दत्तात्रय भरणे
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. राज्यभरात ९२ लाख एकर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ३८ हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला असून, पिकांचे संपूर्ण विनाश झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मदत निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि.२५) दिल्लीला गेले होते. "आम्ही शेतकऱ्यांचे हित जपणारे आहोत. येणाऱ्या काळात चांगली मदत शेतकऱ्यांना केली जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर बोलताना मंत्री भरणे यांनी भावनिक आवाहन केले. "हे नैसर्गिक संकट आहे. शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे. कुटुंबाने कोणाकडे पाहून जगायचं? शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. राज्य सरकार शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. "कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील. शेतकऱ्याला पुन्हा उभ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत," असे ते म्हणाले. मात्र, या निर्णयासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नदीकाठावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री भरणे यांनी वास्तवाची जाणीव करून दिली. "नदी ओढे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्र वाढले असून, भविष्यात अशी संकते टाळण्यासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात," असे ते म्हणाले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला अतिक्रमण हटाव अभियान राबवण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी उल्लेख केला.
धाराशिव (बीड) जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणावरही मंत्री भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, "मी याबाबत माहिती घेईन. व्हिडिओ तपासाला जाईल," असे ते म्हणाले.
माती वाहून गेली तरी भरपाई
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेकऱ्यांना बसत आहे. काही ठिकाणी माती वाहून गेली आहे तर काही ठिकाणी विहिर बुजली आहे अशांनाही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय पावसामुळे एक ते पाच गुंठ्यांमधील शेतीचे नुकसान झाले असे तर त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच कृषी समृद्ध योजना लवकरच प्रभावीपणे राबविण्यात येईल असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.