मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक,चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 11:56 IST2025-08-30T11:55:36+5:302025-08-30T11:56:16+5:30
अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते आम्ही तंतोतंत पाळू.’

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक,चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
पुणे : मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, तरीही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करीत आहोत. कायदा आणि नियमाच्या चौकटीत बसून मार्ग निघेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २९) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, ते आम्ही तंतोतंत पाळू.’
‘राज्यात जेवढे समाज आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेवटी कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मार्ग काढू. तसेच काही मतदारसंघांमध्ये काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सहकारी आहेत, तेदेखील आंदोलनात सहभागी झाले. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे.’
कुणाच्या आरोपांना महत्त्व द्यायचं, त्यालाही काही मर्यादा
ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या आरोपांविषयी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, ‘मी त्यांच्या आरोपांना उत्तर आणि किंमतही देत नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी, ते आत्ताच नाही, याआधीपण त्यांनी आरोप केले आहेत. आपण कुणाच्या आरोपांना महत्त्व द्यायचं, त्यालाही काही मर्यादा आहेत. मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि हाकेंच्या वक्तव्यावर तर अजिबात नाही.’