गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:59 IST2025-09-19T18:57:50+5:302025-09-19T18:59:19+5:30
पडळकर यांच्याबरोबरच भाजपच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.

गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका
पुणे : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी झाशीची राणी चौकात आंदोलन करण्यात आले. पडळकर ही व्यक्ती नव्हे तर भारतीय जनता पक्षाने पाळलेली प्रवृत्ती आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. पडळकर यांच्याबरोबरच भाजपच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या.
जगताप म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजारामबापू पाटील हे महाराष्ट्राचे थोर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याविरोधात पडळकर याने वक्तव्य केले. पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. फडणवीस यांनीच त्यांना पक्षात प्रवेश दिला. असे मंगळसूत्र चोर, खंडणीखोर भाजपला चालत असतील. मात्र, महाराष्ट्राला त्याची सवय नाही. सभ्य व सुसंस्कृत ही राज्याची परंपराच भाजप नासवत आहे. कोणाचेही कसेही चारित्र्यहनन करणे हीच भाजपची प्रवृत्ती आहे. पडळकर सातत्याने पवार घराण्याच्या विरोधात बोलतात. त्यावेळी वास्तविक त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई व्हायला हवी होती. मात्र, भाजपने त्यांना पाळलेले आहे. आता पवार सोडून ते राज्यातील अन्य थोर व्यक्तिमत्त्वावरही आपली नसलेली अक्कल पाजळू लागले आहेत.
राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते झाशीची राणी चौकात सायंकाळी हातात पडळकर यांच्या निषेधाचे फलक घेऊन जमा झाले होते. पडळकर यांचा एक कटआऊटही त्यांनी आणला होता. निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी चौक दणाणून सोडला. पडळकर यांनी तत्काळ माजी मंत्री जयंत पाटील यांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाने पडळकर यांना फक्त समज न देता त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तरच पक्ष अशा निंदनीय वक्तव्यांची दखल घेतो हे लक्षात घेऊन त्यांच्याच पक्षातील अन्य वाचाळवीरांना वचक बसेल, अशी टीका यावेळी करण्यात आली.