leopard attack : बिबट्याच्या हल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; हल्याची सातवी दुर्घटना;अजून किती निष्पाप बळी घेणार??
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:17 IST2025-10-12T16:11:30+5:302025-10-12T16:17:04+5:30
- बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

leopard attack : बिबट्याच्या हल्यात पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; हल्याची सातवी दुर्घटना;अजून किती निष्पाप बळी घेणार??
मलठण (पुणे जि.) - पिंपरखेड (ता.शिरूर) येथे भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडे पाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१२ ) सकाळी पावणे दहा वाजता घडली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पिंपरखेड येथील शेतकरी अरूण देवराम बोंबे यांच्या घरा मागील शेतातजमीन नांगराणीचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या शैलेश बोंबे ही आजोबा अरूण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन येत असताना शेजारच्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून ऊसात फरपटत नेले. आजोबा अरूण देवराम यांनी हे भयावह दृश्य पाहिले असता त्यांनी धाव घेत ऊसात शिरलेल्या बिबट्याशी दोन हात करून बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले.तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच माजी सहकारमंत्री दिलिपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.या घटनेने पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अजून किती मृत्यू पाहावे लागणार
पिंपरखेड, जांबूत आणि चांडोह या दहा ते पंधरा किलोमीटर परिसरात बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही सातवी घटना असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अजून किती मृत्यू पाहावे लागणार असा सवाल उपस्थित होत असून वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.