वर्षभरात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतराष्ट्रीय वाहन परवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:51 IST2026-01-07T12:51:36+5:302026-01-07T12:51:54+5:30
- सुलभ प्रक्रियेमुळे ‘आंतरराष्ट्रीय वाहन परवाना’ काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ

वर्षभरात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतराष्ट्रीय वाहन परवाना
पुणे : परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला आंतराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात पुण्यातून ५ हजार १८४ जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला. तर जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात ५ हजार ६२३ वाहनधारकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात याची नोंद करण्यात आली असून, आंतराष्ट्रीय वाहन परवानाधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.
नोकरी, शिक्षणासाठी परदेशात राहणाऱ्यांची संख्या मोठी असून, भारतीय नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या ठिकाणी तो राहायला आहे, तेथील आरटीओकडून त्याला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअली असल्याने त्याला विलंब लागत होता. नागरिकांना परवाना काढणे सोपे जावे यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. यानुसार संबंधित अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून ‘सारथी’अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या ठिकाणी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
या परवान्यासाठी संबंधित अर्जदाराकडे वाहन परवाना असल्यास पुन्हा वाहन चालवणे तसेच परीक्षा देण्याची गरज लागत नाही. मात्र, त्यांचे सध्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व व्हिसा याची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. यानंतर कागदपत्रांची तपासणी करून आरटीओतून त्याला एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.
एका दिवसात वाहन परवाना :
गेल्या चार वर्षांत आंतराष्ट्रीय वाहन परवाना काढण्याचे प्रमाण वाढत असून, २०२२-२३ या वर्षभरात ४ हजार २९४, तर २०२३-२४ मध्ये ५ हजार २१० आणि जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ५ हजार १८४, तर जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ५ हजार ६२३ जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ४०० जणांची संख्या वाढली आहे.
अशी आहे आकडेवारी :
जानेवारी ते डिसेंबर (२०२४) - ५,१८४
जानेवारी ते डिसेंबर (२०२५) - ५,६२३
केंद्रीय परिहवन विभागाकडून वाहनधारकांसाठी सुलभ प्रक्रिया करून दिली आहे. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या पारपत्र, व्हिसाचा कालावधी आणि कागदपत्रांची पडताळणी करून परवाना देण्यात येत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे