आधी सत्यशोधन समितीचा अहवाल द्या, मगच कुलसचिव नियुक्तीबाबत बाेला..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:26 IST2026-03-26T14:26:09+5:302026-03-26T14:26:24+5:30
- विद्यार्थी संघटनांच्या वतीने कुलगुरूंना निवेदन

आधी सत्यशोधन समितीचा अहवाल द्या, मगच कुलसचिव नियुक्तीबाबत बाेला..!
पुणे : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. यासाठी कमालीची गाेपनीयता पाळण्यात आली असून, कुलगुरूंनी पदाचा गैरवापर करत ही नियुक्ती केली आहे, असा आराेप विद्यार्थी संघटना प्रतिनिधींना केला आहे. तसेच आधी सत्यशोधन समितीचा अहवाल सादर करा, मगच कुलसचिव नियुक्तीबाबत बाेला. ताेपर्यंत नियुक्ती रद्द करा, अशी मागणी करत कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांना निवेदनही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २३ मार्च २०२६ रोजी आपण आपल्या कुलगुरू पदाचा गैरवापर करत (संदर्भ क्र. एएन/१०४६) कुलसचिव नियुक्ती आदेश पारित केला आहे. यात आपण म्हटले आहे की, ‘कुलसचिव’ पदासाठी दि. १० जुलै व १९ जुलै २०२४ रोजी झालेल्या मुलाखतीच्या संदर्भात आपणास कळविण्यात येते की, आपली ‘कुलसचिव’ या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून पाच वर्षे किंवा आपला सेवानिवृत्तीचा दिनांक, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी शासन मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती करण्यात येत आहे; पण ही नियुक्ती कुठल्याही नियमाला धरून नाही.
आपण नियुक्ती आदेश दिलेल्या व्यक्तीबद्दल अनेक तक्रारी आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचेही समोर आलेले आहे. त्या सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सत्यशोधन समिती देखील गठित केलेली होती. सदर समितीची सुनावणी दि. ३० जुलै २०२४ रोजी विद्यापीठाच्या अभ्यागत निवास येथील सभागृहात झाली हाेती. संबंधित समितीचा अहवाल अद्यापपर्यंत प्रसिद्ध केलेला नाही. यासंदर्भात तक्रारदारांना काेणतीही स्पष्टता न देता आपण आपल्या पदाचा गैरवापर करून वादग्रस्त व्यक्तीला कुलसचिवपदी नियुक्ती दिली आहे.
कुलगुरूंनी आपल्या पदाचा गैरवापर करत वादग्रस्त व गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी कुलसचिव म्हणून नियुक्ती दिली आहे. ही नियुक्ती पूर्णपणे नियमबाह्य आहे. संबंधित व्यक्तीची नियुक्ती तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी कुलगुरूंना भेटून लेखी निवेदनही दिले आहे. त्यावर कार्यवाही झाली नाही तर शुक्रवारी (दि. २७) होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिसभेची बैठक उधळून लावून आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहोत. - राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती