‘पीएमपी’त मोबाइलवर रील-चित्रीकरणास सक्त मनाई; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:06 IST2026-01-06T13:00:57+5:302026-01-06T13:06:52+5:30
पीएमपी प्रशासनाने सर्व आगारांना स्पष्ट निर्देश दिले असून,नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिले आहेत.

‘पीएमपी’त मोबाइलवर रील-चित्रीकरणास सक्त मनाई; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये कर्तव्यावर असताना चालक, वाहक व इतर सेवकांनी मोबाइलवर फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग करणे, रील्स तयार करणे व त्या सोशल मीडियावर प्रसारित करणे यास कडक बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पीएमपी प्रशासनाने सर्व आगारांना स्पष्ट निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिले आहेत.
पीएमपीच्या बसेस मार्गावर संचलनात असताना काही चालक-वाहक व सेवक हे महामंडळाचा गणवेश व ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करून मोबाइलद्वारे फोटो, व्हिडीओ व रिल्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही सेवक कर्तव्यावर असताना कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रील स्टार, यूट्युबर किंवा तत्सम व्यक्तींना गणवेश, ई-मशीन व बसेसचा वापर करून चित्रीकरणासाठी सहकार्य करत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
ही बाब पीएमपीच्या अंतर्गत नियम व धोरणांच्या विरोधात असून, यामुळे महामंडळाच्या व्यावसायिक हितासह सार्वजनिक बससेवेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चालक-वाहक कर्तव्यावर असताना गणवेश व आयकार्डसह बसमध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडीओ शूटिंग किंवा रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करता येणार नाहीत. तसेच, महामंडळाची लेखी व पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही रील स्टार, यूट्युबर किंवा तत्सम व्यक्तींना पीएमपीच्या बसेस, आगार, कार्यालयीन परिसर, गणवेश, ई-मशीन वा आयकार्डचा वापर करून चित्रीकरण करण्यास परवानगी देऊ नये.
पीएमपी ही सार्वजनिक सेवा असून, प्रवाशांचा विश्वास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. कर्तव्यावर असताना मोबाइलवर रील्स किंवा चित्रीकरण करणे हे नियमबाह्य आहे. अशा प्रकाराला कुठलीही माफी दिली जाणार नाही. परवानगीशिवाय चित्रीकरण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. - पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपी