पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:58 IST2025-09-18T17:57:56+5:302025-09-18T17:58:34+5:30
कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.

पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, दोन जखमी
पुणे :पुणे-मुंबई हायवेवर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.
अधिकच्या माहितीनुसार, या अपघातात सिद्ध (वय २२) आणि देवराजसिंग राठोड (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर निहाल तांबोळी (वय २०) आणि हर्षवर्धन मिश्रा (वय २२) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या पिंपरीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी देहूरोड पोलिस व पीसीएमसी अग्निशमन दल दाखल झाले. वाहनात अडकलेल्या जखमी आणि मृतदेहांना गाडीचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आले. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान,अपघाताच्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वीच महामार्गावर वेग नियंत्रणासाठी पांढऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. याच पट्ट्यांमुळे पुढील वाहनांचा वेग अचानक कमी होत असून मागील वाहनं धडकण्याचे प्रकार घडत असल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. या अपघातालाही हेच कारण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.