‘म्हाडा’ सोडतीबाबत समाजमाध्यमांवर खोटी अफवा;वाकड-हिंजवडीसंदर्भात कोणतीही जाहिरात नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:35 IST2025-11-11T18:35:25+5:302025-11-11T18:35:39+5:30
- ‘९० लाखांचे घर केवळ ३० ते २८ लाखांत’ मिळत असल्याच्या अफवा पसरत असून, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये

‘म्हाडा’ सोडतीबाबत समाजमाध्यमांवर खोटी अफवा;वाकड-हिंजवडीसंदर्भात कोणतीही जाहिरात नाही
पुणे : समाजमाध्यमांवर वाकड आणि हिंजवडी परिसरातील ‘म्हाडा सोडत’ म्हणून अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हाडाच्या पुणे मंडळाने स्पष्ट केले आहे. काही माध्यमांमध्ये ‘९० लाखांचे घर केवळ ३० ते २८ लाखांत’ मिळत असल्याच्या अफवा पसरत असून, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, पुण्यातील १५ टक्के एकात्मिक योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण ४१८६ घरांसाठी नोंदणी व अर्ज-विक्री प्रक्रियेस ११ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया मूळतः १ नोव्हेंबरला संपुष्टात येऊन त्यानंतर २१ नोव्हेंबरला सोडती काढण्याचे नियोजन होते. परंतु, नंतर मुदतवाढ देण्यात आली असून, आता अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि सोडत ११ डिसेंबरला होणार आहे.
काही दिवसांपासून पुणे म्हाडा मंडळातर्फे वेबसाइट व सोशल मीडिया अकाउंट्सवर वाकड आणि हिंजवडीसारख्या हायडिमांड भागात स्वस्त घर उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या भागांमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या बातम्यांवर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी चौकशीसाठी म्हाडा कार्यालय गाठले. मात्र, प्रत्यक्षात आल्यानंतर मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या पुणे मंडळात अशा कोणत्याही सोडतीची प्रक्रिया सुरू नाही. काही समाजमाध्यमांवरील पेजेस आणि रील्स स्टार्स म्हाडाचा लोगो वापरून खोटी माहिती देत आहेत, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
पुणे मंडळाने नागरिकांना आणि इच्छुक अर्जदारांना विनंती केली आहे की कोणतीही माहिती, जाहिरात किंवा ऑफर पाहिल्यावर ती अधिकृत म्हाडा संकेतस्थळावरून आणि पुणे मंडळाच्या अधिकृत जाहिरातीतून तपासून घ्या. कोणत्याही रील्स स्टार, व्हिडीओ पोस्ट किंवा सोशल मीडिया पोस्टवर अवलंबून थेट निर्णय घेऊ नका; दलालांशी किंवा अविश्वसनीय स्रोतांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.