Police Recruitment 2025 : वाढीव मुदत 'अपडेट' न केल्याने भावी पोलिस भरतीपासून वंचित राहणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:04 IST2025-12-07T17:02:48+5:302025-12-07T17:04:38+5:30
- मुदत वाढल्यानंतरही वाढलेल्या सात दिवसांच्या तारखेचा अर्ज भरण्यासाठी विचार नाही; अर्ज दाखल करण्यासाठी वाढलेले सहा दिवस संकेतस्थळावर 'अपडेट' न केल्याने उमेदवारांत नाराजी

Police Recruitment 2025 : वाढीव मुदत 'अपडेट' न केल्याने भावी पोलिस भरतीपासून वंचित राहणार ?
- प्रशांत ननवरे
बारामती : दरवर्षी पोलिस भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ आणि सर्व्हर मंद गतीने चालत असल्याने राज्य शासनाने पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांचे वय गृहीत धरून उमेदवारांना भरतीसाठी संधी दिली जाते. यंदा मुदत वाढल्यानंतरही वाढलेल्या सात दिवसांच्या तारखेचा अर्ज भरण्यासाठी विचार करण्यात आलेला नाही. पोलिस भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी वाढलेले सहा दिवस संकेतस्थळावर ‘अपडेट’ न केल्यामुळे अनेक उमेदवार या भरती प्रक्रियेतून वंचित राहण्याची शक्यता आहे.
अर्ज सादर करण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे असते. ही वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकपर्यंत, म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येत होते; परंतु मुदत वाढविल्यामुळे ही वयोमर्यादा आपोआपच अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे ७ डिसेंबरपर्यंत विस्तारली गेली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र अजूनही वयोमर्यादा ३० नोव्हेंबरपर्यंतचीच घेतली जात आहे. त्यामुळे अनेक नवीन उमेदवारांना अर्ज करताना अडचणी येत आहेत आणि त्यांचे अर्ज स्वीकृत होत नाहीत.
या गंभीर बाबीचा विचार करून तांत्रिक त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करून उमेदवारांना न्याय मिळावा, ही मागणी केली जात आहे. याबाबत येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर म्हणाले की, पोलिस भरतीची वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत असते. त्यामुळे मुदतवाढ झाल्यामुळे ही वयोमर्यादा आपोआपच फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे ७ डिसेंबरपर्यंत वाढवली गेली पाहिजे. प्रत्यक्षात मात्र ही मुदत संकेतस्थळावर अद्ययावत (अपडेट) नाही. भरती अर्जाचे सॉफ्टवेअरमध्ये वाढीव तारीख ‘अपडेट’ न केल्यामुळे अनेक नवीन उमेदवारांना अर्ज करणे अशक्य झाले आहे. रविवार (दि. ७) हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ही समस्या सोडवावी, अन्यथा थोडी मुदतवाढ देऊन नवीन पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती रूपनवर यांनी केली आहे.
माझी जन्मतारीख २ डिसेंबर आहे. मात्र, ३० नोव्हेंबरपर्यंत जन्मतारीख असणाऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेेत. मुदत वाढून देखील माझा ऑनलाइन अर्ज स्वीकारला जात नाही. केवळ दोन दिवसांसाठी माझी ही संधी जावू नये, त्यासाठी वाढीव मुदत देऊन संबंधित तांत्रिक त्रुटी दूर करावी. - वैष्णवी मदने, विद्यार्थी उमेदवार
माझी ४ डिसेंबरला वयोमर्यादा पूर्ण झाली. त्यामुळे मला पोलिस भरतीची संधी मिळण्याची संधी होती. मात्र, मुदत वाढूनदेखील वाढीव सात दिवसांची तारीख मिळालेली नाही. कुटुंबीयांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकारने वाढीव तारखेनुसार अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढवावी. - सुप्रिया नवले, विद्यार्थी उमेदवार