विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:36 IST2025-12-07T14:36:18+5:302025-12-07T14:36:42+5:30
- नवीन मुदतवाढीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दि. २१ डिसेंबरपर्यंत संधी मिळणार आहे.

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त १११ पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यात ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत रविवारपर्यंत (दि.७) होती. याला मुदतवाढ दिली असून, आता दि. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठ कॅम्पसमधील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य सहायक प्राध्यापक ४७, सहयोगी प्राध्यापक ३२ आणि प्राध्यापक ३२ अशा एकूण १११ रिक्त शिक्षकी पदांच्या भरतीची ही प्रक्रिया सुरू आहे. पूर्व नियाेजनानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दि. ८ नोव्हेंबर ते दि. ७ डिसेंबर दरम्यान राबविली जाणार हाेती. त्यानंतर अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत मुदत दिलेली होती.
नवीन मुदतवाढीनुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दि. २१ डिसेंबरपर्यंत संधी मिळणार आहे. त्यानंतर अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या दरम्यान पूर्वी अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल/ सुधारणा करू शकतात. तसेच नवीन उमेदवार देखील अर्ज करू शकतात, असेही विद्यापीठाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.