स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:10 IST2025-07-09T15:09:25+5:302025-07-09T15:10:15+5:30
वेल्हे तालुक्यातील घिसर गावातील चित्र; पुलाची मागणी करूनही दुर्लक्ष

स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास
- शंकर ढेबे
पानशेत : स्वातंत्र्योत्तर काळानंतरही वेल्हे, भोर, मुळशी तालुक्यातील अनेक धनगरवाडे हे ओढ्या पलीकडे असल्याने येथील धनगर बांधव धोकादायक नदीपात्रातून प्रवास करत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. असेच वेल्हे तालुक्यातील घिसर गावाच्या हद्दीतील कचरे वस्तीतील ग्रामस्थांना कानंदी नदीवरील लाकडाच्या साकवावरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
सगळीकडे पावसाळा सुरू झाला असून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ओढे, नदी, नाले हे दुथडी भरून वाहत आहेत. वेल्हे तालुक्यातील काही धनगर वस्त्यांना ये-जा करण्यासाठी ओढे, नदी पात्रातून रस्ता असल्याने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वाहत्या पाण्यातून जात आहेत.
घिसर येथील कचरे वस्ती व हिरवे वस्ती ही शासनाकडे अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करत आहेत. परंतु त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. येथील शाळकरी मुले दररोज अशा धोकादायक साकवावरून जीवघेणा प्रवास करत आहेत. तर गरोदर माता, आजारी व्यक्तींना या पुलावरून तारेवरची कसरत करत दवाखाना पकडावा लागत आहे.
प्रशासन गप्प
नागरिकांना कामधंद्यासाठी याच पुलावरून जावे लागत असल्याने यांच्या पाचवीला संघर्ष पुरला आहे. प्रशासन नागरिकांचा बळी गेल्यावर जागे होणार का? असा सवाल येथील नागरिक रघुनाथ कचरे यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुळशीतील वेगरे गावातील धनगरवाड्यावरचे कोंडिबा मरगळे हे नदीपात्रातून घरी जात असताना वाहून गेल्याने मृत्यू पावले अशा अनेक घटना भोर-वेल्हा-मुळशीतील धनगर वस्त्यांवर घडत असताना प्रशासन मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून गप्प आहे.
मोठ्या दुर्घटनाची शक्यता
लाकडी पूल असल्याने तो कधीही तुटून पडू शकतो. अशा वेळेस या साकवावरून प्रवास करणारे नागरिक रौद्र रूप धारण केलेल्या कानंदी नदीत पडून थेट मृत्यूच्या दारात जाऊ शकतात. लाकडाच्या साकवाऐवजी लोखंडी साकव पावसाळ्यापूर्वी उभारणे आवश्यक आहे. पावसाळा संपल्यानंतर चांगल्या दर्जाचा पूल उभारणे आवश्यक आहे.
मागणीला केराची टोपली
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाकडे ग्रामस्थ मागणी केली करत आहेत परंतु फक्त आश्वासन मिळत आहेत. परंतु, यावर ठोस निर्णय होत नसल्याने आमच्या मागणीला प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.