उन्हाळ्याआधीच वीजबिलाचा ‘करंट’..! युनिट वाढ दाखवून ग्राहकांना दुप्पट आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:47 IST2026-02-21T13:46:30+5:302026-02-21T13:47:31+5:30
चुकीच्या मीटर रीडिंगमुळे ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्याआधीच वीजबिलाचा ‘करंट’..! युनिट वाढ दाखवून ग्राहकांना दुप्पट आकारणी
पुणे : शहरातील अधिकांश वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलाचे मेसेज आल्याने 'शॉक' बसत आहे. उन्हाळाही सुरु झालेला नाही, ना एसी, ना फॅनचा वापर. तरीही युनिटमध्ये वाढ झाल्याचे दाखवून जादा रक्कम आकारण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही अवास्तव बिल येत आहे. मग, सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन उपयोग काय? असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. चुकीच्या मीटर रीडिंगमुळे ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबाचे मासिक अंदाजपत्रक ठरलेले असते. दर महिना किती वीज बिल येते माहिती असल्याने तेवढी रक्कम बाजूला काढली जाते. नोकरदार ग्राहक ऑनलाइन पेमेंट करण्यावर अधिकांश भर देतात. साधारणपणे महावितरणाकडून २० तारखेनंतर बिलांचे वितरण केले जाते. मात्र त्यापूर्वी बिलाच्या रकमेचा मेसेज ग्राहकांना पाठविला जातो. बहुतांश ग्राहकांना दुप्पट रकमेच्या वीज बिलाचे मेसेज आल्याने ग्राहक गोंधळात सापडले आहेत.
उन्हाळा देखील अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे एसी आणि फॅनचाही वापर नाही. मग इतके युनिट वाढले कसे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे मिळू शकलेली नाहीत.
आम्ही दोन वर्षांपासून प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे लाभार्थी आहोत. दर महिन्याला युनिटच्या वापरानुसार वीज बिलाची आकारणी होते. त्याप्रमाणे ३५० ते ४५० रुपयांपर्यंतचे बिल येते. मात्र, या महिन्यात ३१०० रुपये बिलाचा मेसेज आल्याने आम्हाला घामच फुटला आहे. मग दीड ते २ लाख रुपये भरून पॅनल बसविण्याचा उपयोग काय? - वीज ग्राहक, पुणे
आमचा विजेचा वापर कायम १३५ ते १३७ युनिट एवढा असतो. त्यामुळे वीज बिल कायम १३०० ते १५०० च्या घरात येते. मात्र, या महिन्यात २३६ युनिट इतका वापर केल्याचे सांगून २७४० रुपयांचे बिल आले आहे. फॅन आणि एसी चालू नसताना अचानक १०० युनिट कसे वाढले? - वीज ग्राहक, पुणे
आम्ही सगळे दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो. साधा फॅन किंवा टीव्हीचाही वापर होत नाही. तरीही दुप्पट बिल आले आहे. - नोकरदार महिला, पुणे
सोलर सिस्टीममध्ये सहसा दोन मीटर वापरले जातात: एक जनरेशन मीटर जे पॅनेलद्वारे तयार झालेली एकूण वीज मोजते आणि दुसरे नेट मीटर जे महावितरणद्वारे लावले जाणारे मुख्य मीटर आहे. हे दोन्ही बाजूंची ग्रीडकडून आलेली आणि ग्रीडला दिलेली वीज मोजते. यात जनरेशनचे रीडिंग टाकायचे राहून गेले असेल किंवा सरासरी वीज बिल आकारण्यात आले असेल. ज्यांचे युनिट जास्त दाखविले असेल तर तिथे कदाचित रीडिंग घ्यायला व्यक्ती गेला नसेल. त्यामुळे सरासरी वीज बिलाची आकारणी झाली असेल. मीटर रीडर बदलला तरी असे होऊ शकते. यासंदर्भात आमची मीटिंग देखील झाली आहे. - विकास पुरी, जनसंपर्क अधिकारी महावितरण
आमचे घोरपडीतील घर गेल्या जानेवारी २०२५ पासून बंद आहे. तरी देखील दर महा बिल पाठवले जाते. गेल्या पाच महिन्यांपासून, तर दरमहा १२४ युनिट दाखवून बिल दिले आहे. याविषयी महावितरणकडे तक्रार केली, परंतु, तरी देखील जादा बिल देण्याचा प्रकार सुरूच आहे. सरासरी बिल लावले जाते, अशी उत्तरे महावितरणकडून दिली जात आहेत. - वीज ग्राहक, घोरपडी, पुणे