PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेवर भाजपचाच वरचष्मा..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:31 IST2025-10-05T10:29:23+5:302025-10-05T10:31:12+5:30
- अंतिम प्रभाग रचना जाहीर; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात कोणताही अनुकूल बदल केलेला नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्याचा आरोप

PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेवर भाजपचाच वरचष्मा..!
पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना भाजपलाच अनुकूल झाली आहे. प्रारूप प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासाठी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये काही बदल केले आहेत. पण, अनेक ठिकाणी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागामध्ये कोणताही अनुकूल बदल केलेला नाही. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेवर भाजपचाच वरचष्मा राहिला आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. महापालिकेची प्रभागरचना करताना भाजपने विश्वासात न घेता परस्पर प्रभागरचना करून घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक ३८ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागामध्ये किरकोळ बदल केले आहेत. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत भाजपमध्ये अन्य पक्षांतून प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग हे अनसेफ झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिंदेसेनेच्या काही पदाधिकाऱ्याचे प्रभाग प्रारूपमध्येच अनुकूल झाले होते. ते कायम ठेवले आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची मोडतोड कायम
अंतिम प्रभाग रचनेत महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रभागाची अक्षरश: मोडतोड कायम आहे. त्यात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह माजी नगरसेवकांच्या प्रभाग तोडले आहेत.
प्रभाग रचनेत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हस्तक्षेप केला आहे. त्यामुळेच पूर्णत: भाजपला अनुकूल प्रभाग रचना झाली आहे. पालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून मुख्यमंत्र्यांचा पालिकेत थेट हस्तक्षेप वाढल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.
भाजपचा रडीचा डाव
महाराष्ट्राचे नगररचना खाते नावापुरते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असले, तरी या खात्याची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हलवले जातात. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील इतर घटक पक्षांना विश्वासात न घेता फडणवीस यांनी रडीचा डाव खेळत ही प्रभाग रचना केली. या प्रभाग रचनेवर हजारो पुणेकरांनी आक्षेप नोंदवला होता, मात्र प्रत्यक्षात प्रभाग रचनेत काहीही बदल न करता केवळ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करून भाजपने पुणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या बळावर हा रडीचा डाव खेळला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
राजकीय हेतूने केलेली प्रभाग रचना
प्रभाग रचना अंतिम करताना अनेक ठिकाणी प्रभागाची लोकसंख्या वाढविली आहे. पण, हरकती सूचना या केवळ नावालाच घेतल्या आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन भाजपने प्रभाग रचना करून वरचष्मा ठेवला आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी केली आहे.