जेजुरीत गाढवांच्या बाजाराला उतरती कळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:20 IST2026-01-02T19:20:04+5:302026-01-02T19:20:21+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत दरवर्षी पौष पौर्णिमेला पारंपरिक गाढवांचा बाजार भरत असतो.

जेजुरीत गाढवांच्या बाजाराला उतरती कळा
- बी. एम. काळे
जेजुरी - तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत दरवर्षी पौष पौर्णिमेला पारंपरिक गाढवांचा बाजार भरत असतो. या बाजारात गाढवांची संख्या खूपच कमी होती.यंत्र युगात गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाल्याने या बाजाराला उतरती कळा आली आहे. बाजारात गाढवांची संख्या खूपच कमी होती. यात्रेपूर्वी सुरु होणाराव यात्रेच्या दुसऱ्या दिवसांपर्यंत चालणारा हा बाजार यात्रेपूर्वीच आटोपला. एकच विशेष म्हणजे बाजारात गाढवांची किमंत आजही टिकून आहे.
यावर्षी पौष पौर्णिमा यात्रेपूर्वीच च बाजार संपत आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. यंदा गुजरात मधील अमरेली परिसरातून ९० काठेवाडी गाढवे विक्रीसाठी आली होती. बाजार भरण्यापूर्वी या गाढवांची विक्री झाली. ५० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत एका एका गाढवाची विक्री झाली. जेजुरी येथील बंगाली पटांगणात सुमारे चारशे ते पाचशे गावठी गाढवे विक्रीसाठी आली असून वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत या गाढवांचा विक्री होत आहे.
गाढवाचे दात पाहून त्यांचे दर ठरत होते, दोन दातांचा दुवान, चार दातांचा चवान , संपूर्ण दातांचा अखंड, यावरून गाढवाची किंमत ठरत होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील व्यापारी गाढवांचा खरेदीसाठी आले आहेत. पौष पौर्णिमेनिमित्त बहुजन समाजाच्या लोक देवदर्शना बरोबरच पारंपरिक पद्धतीने गाढवांचा खरेदी विक्री साठी दरवर्षी येत असतात. पूर्वी या बाजार संपल्या नंतर वैदू, भातू कोल्हाटी यांच्या जात पंचायत, न्याय निवाडे, मुलींचे विवाह ठरविले जात. मात्र गेल्या दहा वर्षापासून या प्रथा बंद झाल्या आहेत. मात्र वैदू समाज कुस्ती प्रिय असून बाजार नंतर कुस्त्यांचे आखाडे जेजुरीत भरविले जातात. या कुस्त्यांच्या आखड्यासाठी मोठ्या प्रमाणत मल्ल उपस्थित राहतात. पौष पौर्णिमा यात्रा भटक्या विमुक्त जाती जमातीची यात्रा मानली जाते. यात्रेला वैदू, पाथरवट, कैकाडी, परीट, गोसावी, गारुडी, बेलदार, आदी समाजबांधव जेजुरीत वर्षातील देवाची वारी करण्यासाठी येथे आलेले आहेत. देवदर्शन उरकून ते माघारी जात होते.