सीईटी परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर? आमदार राहुल कुल यांची कठोर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 17:17 IST2026-04-05T17:16:53+5:302026-04-05T17:17:27+5:30
२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या परीक्षेतील सामान्यज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

सीईटी परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर? आमदार राहुल कुल यांची कठोर कारवाईची मागणी
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एल.एल.बी. तिसऱ्या वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादरपूर्वक उल्लेख झाल्याचा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.
२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या परीक्षेतील सामान्यज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आमदार कुल यांनी नमूद केले.
यासंदर्भात बोलताना कुल म्हणाले, “ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन उभे आहे आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत अशा प्रकारे करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.” अनेक परीक्षार्थींनी याबाबत तक्रारी केल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कुल यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना पत्र पाठवून काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समिती व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, सीईटी सेलकडून सार्वजनिक माफी मागणे, तसेच भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, पुढे सर्व शासकीय व शैक्षणिक साहित्यामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज” असा पूर्ण आणि आदरयुक्त उल्लेख अनिवार्य करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदारी आणि संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.