भाजपच्या कथनी–करणीत फरक; खोटी आश्वासने देत असल्याची विरोधकांकडून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:08 IST2026-01-21T12:08:05+5:302026-01-21T12:08:40+5:30
भाजपच्या कथणी आणि करणीमध्ये फरक; अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून विरोधकांचा हल्लाबोल

भाजपच्या कथनी–करणीत फरक; खोटी आश्वासने देत असल्याची विरोधकांकडून टीका
पुणे : महापालिका निवडणुकीच्या संकल्पपत्रामध्ये फ्लेक्समुक्त पुण्याचे आश्वासन दिले होते. परंतु महापालिका निवडणुकीनंतर भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या अभिनंदनपर शहरभर अनधिकृत फ्लेक्स झळकत आहेत. यावरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या कथणीत आणि करणीत फरक असून, खोटी आश्वासने देणे, हा भाजपचा स्थायीभाव असल्याची टीका केली आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेताच विद्युत खांब, पथदिवे, सिग्नलचे खांब, चाैकांसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभारले जातात. अशा अनधिकृत फ्लेक्सवर आकाशचिन्ह विभागाकडून व अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, राजकीय दबावामुळे प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते. परिणामी, महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी टीका होते.
भाजपने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात (संकल्पपत्र) शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच विद्रुपीकरण थांबवण्याचे, शहर फ्लेक्स मुक्त करण्याचे आश्वासन पुणेकरांना दिले. इतकेच नाही तर प्रचाराचा जोर चढल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी आलिशान हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘फ्लेक्स’मुक्त पुण्याचा नारा दिला होता.
मात्र, निवडणूक संपताच भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फ्लेक्स शहरातील विद्युत खांब, पथदिव्यांचे खांबांवर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या फ्लेक्सनी पदपथ अडवले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या कथणीत आणि करणीत फरक असून, खोटी आश्वासने देणे, हा भाजपचा स्थायीभाव आहे, त्यांचा विश्वास केवळ ईव्हीएम मशीनवर असल्याने त्यांनी जनतेला काय वाटते, याचे काहीही देणे घेणे नाही, अशी टीका केली आहे.
भाजपचे नेते सांगतात एक आणि करतात एक, हा पूर्वीपासूनचा अनुभव आहे. त्यांचा केवळ इव्हीएम मशीनवर विश्वास आहे, त्यामुळे ते जनतेचा विचार करत नाहीत. प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्यासारखी खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकणे आणि निवडून आल्यानंतर आपणास हवे तेच करणे, ही भाजप नेत्यांची सवय आहे. - गजानन थरकुडे, शहरप्रमुख, उद्धवसेना
भाजपची कथणी आणि करणी यात कायमच फरक राहिला आहे. त्यामुळे आम्ही जनतेला भाजपवर विश्वास ठेवू नका, असे सांगतो. खोटे बोलणे हा भाजपचा स्थायीभाव आहे. भाजपने आजवर जी जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण केली नाहीत. निवडणुकीत दिलेले आश्वासन एक जुमला होता, असे ते निवडणुकीनंतर सांगतात. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस
आम्ही नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी अनधिकृत फ्लेक्स उभे करू नयेत, जे फ्लेक्स लावायचे ते अधिकृत होर्डिंगवरच लावावेत, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, उत्साहात काही नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी फ्लेक्स उभारले आहेत. अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढावेत, अशी सूचना आम्ही पुन्हा एकदा ग्रुपवरून करणार आहोत.
- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप