RTE admission : पालकांनो लक्ष द्या ...! आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:06 IST2026-03-26T18:05:36+5:302026-03-26T18:06:38+5:30
पुणे जिल्हा आघाडीवर आहे. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभाग करत आहे.

RTE admission : पालकांनो लक्ष द्या ...! आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे पालकांना अर्ज सादर करण्यासाठी बुधवारी (दि. २५) शेवटची संधी हाेती. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गाेसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ यासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने पालकांना माेठा दिलासा मिळाला आहे. यामुळे २५ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया पार पडणार आहे.
याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. राज्यभरात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार १३४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ५० हजार ८९३ अर्ज पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभाग करत आहे. सदर अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच संबंधित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट केले जात आहे.