Accident : DJ डान्सर गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षा चालकाला उडवलं, चालक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:43 IST2025-09-30T18:42:57+5:302025-09-30T18:43:22+5:30
या अपघातात गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला

Accident : DJ डान्सर गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षा चालकाला उडवलं, चालक गंभीर
धायरी : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली असून यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात मुंबई–बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात आज (मंगळवारी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला.
अधिक माहितीनुसार, या अपघातात गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून रिक्षातील दोन प्रवासी देखील जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वासच्या समोर घडला. सामाजी विठ्ठल मरगळे (वय ४४, रा. सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलच्या कारची रिक्षाला मागून धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की रिक्षाचे मोठे नुकसान झाले आणि रिक्षाचालक गंभीररित्या जखमी झाला. तसेच या रिक्षामध्ये दोन प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. गौतमी पाटील कारमध्ये होती की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सिंहगड रस्ता पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत.
अपघातानंतर कारचालक कारसह फरार
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या किया कंपनीच्या कारने रिक्षाला जोराची धडक दिल्यानंतर कारचालक कारसह फरार झाला. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे.