कुकडी प्रकल्पातील धरणे १०० टक्के भरली, विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:36 IST2025-10-01T10:35:53+5:302025-10-01T10:36:02+5:30
नारायणगाव-वारूळवाडी येथील नेवकर पुलावरून पाणी गेल्याने हा रस्ता बंद करण्यात आला

कुकडी प्रकल्पातील धरणे १०० टक्के भरली, विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील येडगाव, डिंभे, वडज, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी ही पाच धरणे १०० टक्के भरली असून, त्यातून विसर्ग सुरू झाला आहे. सध्या या धरणांमध्ये २७.४५ टीएमसी (९२.५१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १.२३ टीएमसीने अधिक आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
वडज धरणातून विसर्गामुळे मीना नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नारायणगाव-वारूळवाडी येथील नेवकर पुलावरून पाणी गेल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. वारूळवाडी ग्रामपंचायतीने रविवारी रात्रीपासून भोंगा वाजवून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला. नदीकाठच्या कातकरी समाजातील कुटुंबांना नारायणगाव पोलिस आणि ग्रामपंचायतीने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र. ०२ चे उपविभागीय अधिकारी आर. जे. हांडे यांनी नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठचे पंप, शेती अवजारे व जनावरे तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
धरणांमधील विसर्ग आणि पाणीसाठा
येडगाव धरण : १०० टक्के भरले असून, कुकडी नदीत २००० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू. पाणलोट क्षेत्रात ५०८ मि.मी. पाऊस.
वडज धरण: १०० टक्के भरले, मीना नदीत १८०० क्युसेक विसर्ग बंद. पाणलोट क्षेत्रात ६५६ मि.मी. पाऊस.
पिंपळगाव जोगा : ९३.५५ टक्के भरले, ७५० क्युसेक विसर्ग. पाणलोट क्षेत्रात ६९५ मि.मी. पाऊस.
डिंभे धरण : १०० टक्के भरले, घोड नदीत ५००० क्युसेक विसर्ग. पाणलोट क्षेत्रात ११९० मि.मी. पाऊस.
चिल्हेवाडी धरण : १०० टक्के भरले, १४१ क्युसेक विसर्ग. पाणलोट क्षेत्रात ७३० मि.मी. पाऊस.
माणिकडोह धरण : ८२.३७ टक्के भरले, पाणलोट क्षेत्रात ७३९ मि.मी. पाऊस.
सध्या पाच धरणांमध्ये २७,४५५ द.ल.घ.फूट (९२.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या २६,२२८ द.ल.घ.फूट (८८.३८ टक्के) पेक्षा जास्त आहे.