कीर्तनकार भंडारे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांचा निषेध;जाहीर माफीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:44 IST2025-08-21T18:39:40+5:302025-08-21T18:44:33+5:30
या वारकरी विचारधारेने कधीही द्वेष, हत्या असे विचार शिकवलेले नाही. मात्र स्वत:ला कीर्तनकार म्हणवणाऱ्या भंडारे याने माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली,

कीर्तनकार भंडारे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांचा निषेध;जाहीर माफीची मागणी
पुणे : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे याने वारकरी तसेच कीर्तन परंपरेला न शोभणारे वक्तव्य केले, याबद्दल त्याने समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी ज्येष्ठ गांधीवादी काँग्रेस नेते, माजी आमदार उल्हास पवार यांनी केली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते हनुमंत पवार यांनाही याबद्दल भंडारे याचा निषेध केला.
पवार म्हणाले, कीर्तन परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. हजारो कीर्तनकारांनी समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य कीर्तनामधून केले आहे. या वारकरी विचारधारेने कधीही द्वेष, हत्या असे विचार शिकवलेले नाही. मात्र स्वत:ला कीर्तनकार म्हणवणाऱ्या भंडारे याने माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यासाठी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले.
वास्तविक या भयंकर वक्तव्याची स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यायला हवी व भंडारे याच्यावर कारवाईचे आदेश दिले पाहिजेत. तो माफी मागत नसेल तर फडणवीस यांनी तत्काळ अशी कारवाई करावी, अशी मागणीही पवार यांनी केली. प्रदेश उपाध्यक्ष जोशी तसेच प्रवक्ते पवार यांनाही भंडारे याला सरकारने पाठीशी घालू नये, अशाने या प्रवृत्ती फोफावतील, त्यामुळे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली.