काँग्रेसला दादांचा दणका..! पुण्यात हाताची साथ सोडून शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:53 IST2025-10-10T11:52:58+5:302025-10-10T11:53:47+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का देत आपली ताकद दाखवून दिली आहे.

काँग्रेसला दादांचा दणका..! पुण्यात हाताची साथ सोडून शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापली राजकीय समीकरणं मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का देत आपली ताकद दाखवून दिली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि त्यांचे सुपुत्र साक्षात शेट्टी हे आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गटात) प्रवेश करणार आहेत. शेट्टी कुटुंबाचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय वजन असून, त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार आज पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्याच कार्यक्रमादरम्यान हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
2017 पर्यंत राष्ट्रवादीचा पुण्यात निर्विवाद बालेकिल्ला होता. मात्र, पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गट दोघेही आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचवेळी 2017 मध्ये भाजपने पुण्यात राष्ट्रवादीचा गड भेदला होता. आता पुन्हा एकदा महापालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवारांनी पक्षप्रवेशाचा डाव खेळत आपली मोहिम सुरू केली आहे