भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:50 IST2025-09-27T18:49:46+5:302025-09-27T18:50:29+5:30
या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या गुंडांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.

भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी; काँग्रेसची मागणी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल केली, म्हणून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भाजपशी संबंधित असलेल्या ८ ते १० गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भर रस्त्यात साडी नेसवून त्यांचा अपमान केला. या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या गुंडांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने केली आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मागणीबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे निवेदन स्वीकारले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चवधरी, अजित दरेकर, रफिक शेख, सुजित यादव, प्राची दुधाणे, राज अंबिके, फिरोज शेख, मुन्ना खंडेलवाल, कुणाल चव्हाण आदी उपस्थित होते. पगारे यांना एकटे गाठून या भाजपाच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला, ही गंभीर स्वरूपाची घटना आहे. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, ही अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी बाब आहे. भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे.