अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना; पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:08 IST2025-06-27T20:07:16+5:302025-06-27T20:08:12+5:30

तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?; वेळेत प्रवेश मिळाला नाही तर अभ्यासक्रम पूर्ण हाेणार कसं?

pune news confusion over 11th admissions continues; concerns of parents, students remain unaddressed | अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना; पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना

अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना; पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा तब्बल दहा दिवस आधी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण हाेणार, म्हणून पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत हाेते; पण अकरावी प्रवेश प्रक्रियेत वारंवार हाेणाऱ्या विलंबामुळे आनंदावर विरजण फिरले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणीत अडकली असून, पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास पुन्हा चार दिवस विलंब हाेत असून, ही यादी साेमवारी (दि. ३०) जाहीर हाेईल, असे सांगितले जात आहे. याबद्दल विद्यार्थी-पालक यांच्यासह महाविद्यालय प्रशासनाकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ दिसत नसल्याने प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर हाेण्यास उशीर हाेत आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही नव्याने प्रसिद्ध करावे लागले आहे. पण, मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार?, प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रवेशासाठीही ‘तारीख पे तारीख?’

अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होत आहे. त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ३० जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले आहे; परंतु, ३० जून ही तारीख तरी पाळली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.

Web Title: pune news confusion over 11th admissions continues; concerns of parents, students remain unaddressed