शिक्षण व्यवस्थेचा गोंधळ..! पुणे महापालिकेच्या ९१ शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त; कारभार कसा चालतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:13 IST2026-03-17T10:13:35+5:302026-03-17T10:13:58+5:30
या शाळांमधील कारभार चालतो तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षण व्यवस्थेचा गोंधळ..! पुणे महापालिकेच्या ९१ शाळांत मुख्याध्यापक पदे रिक्त; कारभार कसा चालतोय?
पुणे : पुणे महापालिकेच्या मराठी माध्यमातील ८०, तर उर्दु माध्यमाच्या ११ शाळा अशा ९१ शाळांना मुख्याध्यापक नसल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या प्रश्नोत्तरातून उघकीस आली आहे. त्यामुळे या शाळांमधील कारभार चालतो तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे महापालिकेत गेली चार वर्षे प्रशासक राज होते. त्यानंतर पालिका निवडणुका झाल्या. चार वर्षांनंतर पालिकेचे सभागृह अस्तित्त्वात आले आहे. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नाेतरांना सुरुवात झाली. त्यात भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक यांनी पालिकेच्या किती शाळांमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त आहे, याची माहिती विचारली. त्यात मराठी माध्यमातील ८०, तर उर्दु माध्यमाच्या ११ शाळा या प्रकारे ९१ शाळांना मुख्याध्यापक नाही.
पालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील एकूण ४३ शाळांपैकी अनुदानित शाळा १८ आहेत. मुख्याध्यापक पद भरण्याबाबत पालिका प्रशासनाने पदोन्नती प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन कार्यवाही सुरू केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे लेखी उत्तर पालिका प्रशासनाने दिले आहे.
दरम्यान, मराठी शाळा वाचविल्या पाहिजेत, या शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे, असे अनेक प्रश्न असताना आता मुख्याध्यापकच नाहीत, हे धक्कादायक आहे. मुख्याध्यापकच नसतील, तर त्या शाळांची अवस्था बिकट असणार आहे. याविषयी मात्र महापालिका गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे.